Thursday, November 19, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRATOP NEWS

मुंबई क्रूझ ड्रग पार्टी प्रकरण : अभिनेत्री अनन्या पांडेला एनसीबीचे समन्स; घरी NCB कडून छापेमारी

मुंबई : क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात सध्या बॉलिवूड एनसीबीच्या रडारवर आहे. बॉलिवूड किंग खानचा मुलगा आर्यान खान सध्या अटकेत असून त्याची चौकशी सुरू आहे. आता एनसीबीने अभिनेते चंकी पांडे यांची मुलगी आणि अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी छापा टाकला आहे. यामध्ये अनन्याचा मोबाईल, लॅपटॉप आदी वस्तू ताब्यात घेण्यात आल्या. तसेच दुपारी दोन वाजता चौकशीला उपस्थित राहण्यासाठी अनन्या पांडेला एनसीबीने समन्स बजावले आहे.

एनसीबीकडून मन्नतवर सर्च ऑपरेशन 

एनसीबीकडून क्रूझ ड्रग पार्टी प्रकरणात चौकशी सुरु असून आज एनसीबीच्या पथकाने शाहरुख खानच्या राहत्या घरी छापा टाकला, अशी चर्चा होती. परंतु, एनसीबीकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानुसार, शाहरुख खानच्या मन्नतवर कोणताही छापा टाकण्यात आला नसून, काही कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी एनसीबीचे पथक शाहरुख खानच्या घरी गेले होते. परंतु, सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एनसीबीने  सर्च वॉरंटसह मन्नतवर धडक दिली असून शाहरुखच्या घरी एनसीबीकडून सर्च ऑपरेशन केले आहे.

आर्थर रोड तुरुंगात शाहरुख-आर्यनची भेट 

आर्यन खान गेल्या 18 दिवसांपासून आर्थर रोड तुरुंगात आहे. आज शाहरुख खाननं आर्थर रोड तुरुंगात जाऊन आर्यनची भेट घेतली. जवळपास 10 मिनिटं ही भेट झाली. दरम्यान, काल आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांचे जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला असून येत्या मंगळवारी या जामीन अर्जावर पुन्हा सुनावणी होणार आहे.

 

Leave a Reply