अ. भा. विद्यार्थी परिषदेतर्फे विद्यार्थ्यांचे मास्क वाटून स्वागत
गडचिरोली :कोरोनामुळे बऱ्याच कालावधीनंतर महाविद्यालय सुरू झाल्याने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे मास्क व सॅनिटायझर वाटप करून शहरातील शिवाजी महाविद्यालय,गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली आणि आदर्श महाविद्यालय वडसा येथे विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
दोन वर्षांपासून कोरोना प्रादुभार्वामुळे राज्यातील महाविद्यालये बंद होती. विद्यार्थी आभासी पध्दतीने शिक्षण घेत होते. परंतु विद्यार्थ्यांना आभासी शिक्षणामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे बुधवार २० ऑक्टोबर पासून महाविद्यालये सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे शिवाजी महाविद्यालय,गोंडवाना विद्यापीठ आणि आदर्श महाविद्यालय वडसा यथे महाविद्यालयात जाऊन विद्यार्थ्यांना मास्क वाटप करीत स्वागत करण्यात आले. तसेच महाविद्यालयातील प्राचार्यांसोबत सध्याच्या शैक्षणिक परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. उपक्रमात विदर्भ प्रांत सहमंत्री अभिषेक देवर यांच्यासह नगर मंत्री जयेश ठाकरे , भाग संयोजक अक्षय कोकोडे . मोनाली भगत व अभाविप कार्यकर्ते सहभागी झाले होते.
