Saturday, September 26, 2026
Latest NewsPUNE

पुणेकरांनी काश्मीरमधील १२०० सैनिकांप्रती व्यक्त केली कृतज्ञता

भारतमाता महिला मंडळ ट्रस्टचा पुढाकार ; काश्मीरमधील मच्छल भागातील १२०८ सैनिक व १९२ नागरिकांना प्रत्यक्ष जावून दिला दिवाळी फराळ 

पुणे : भारत माता की जय… च्या जयघोषाने काश्मीरमधील ग्रामीण भागातील डोंगराळ परिसर दुमदुमून गेला. नुकताच पार पडलेला विजयादशमी उत्सव आणि येणा-या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पर्वती भागातील भारतमाता महिला मंडळ ट्रस्टच्या २५ स्वयंसेवकांनी काश्मीरमधील १२०० सैनिक व १९२ नागरिकांना दिवाळी फराळ देऊन त्यांच्या कार्याप्रती ॠण व्यक्त केले. सैनिकांच्या अपार देशकार्याला सलाम म्हणून आणि भारतीय नागरिक त्यांच्यासोबत आहेत, या भावनेतून या अनोख्या उपक्रमाचे आयोजन पुणेकरांनी केले होते. 

उपक्रमाचे आयोजन ट्रस्टच्या प्रियांका शेंडगे-शिंदे यांनी केले होते. यामध्ये माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, राजाभाऊ शेंडगे, मृणाल होनप, रचना शिंदे, मृण्मयी परळीकर, हेमा शिंदे, आदित्य पद्मवार, शर्वरी आपटे, आकाश मालोदे, मयूर पाटील, अमोघ पानगावे, पार्थ तुंगतकर, सारिका सप्रे आदी स्वयंसेवक सहभागी झाले होते. सर्वजण तेथील देशभक्तीने भारलेले वातावरण पाहून भारावून गेले. 

प्रियांका शेंडगे-शिंदे म्हणाल्या, राष्ट्रहित सर्वप्रथम हे ध्येय समोर ठेऊन कार्यरत असलेल्या भारतीय सैनिकांप्रती ॠण व्यक्त करण्याकरीता पुण्यातील महिला आणि युवा स्वयंसेवकांनी या उपक्रमात सहभाग घेतला. तसेच तेथील स्थानिक रहिवाशांच्या घरात राहून व भोजन करुन त्यांना आर्थिक सहाय्य देखील केले. विजयादशमीचा शस्त्रपूजन कार्यक्रम काश्मीरमधील मच्छल भागातील सैनिकांसोबत साजरा करण्यात आला. काश्मीर मधील सद्यपरिस्थिति पाहता सद्भावनेचा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा हा प्रयत्न पुणेकरांसहित मच्छलवासियान्नाही भारावून टाकणरा होता.

भारतीय सैनिक आणि तेथील स्थानिक नागरिकांना दिवाळी फराळ किट देखील देण्यात आले. तब्बल १४०० हून अधिक किट पुण्यातून काश्मीरमध्ये नेण्यात आले होते. यामध्ये ५०० किलो लाडू, चिवडा, चकली, करंजी, शेव या पारंपरिक महाराष्ट्रीयन फराळाचा समावेश होता. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती व पुणेरी पगडी देखील तेथील लष्करी अधिका-यांना भेट देण्यात आली. प्रत्यक्ष काश्मीरमधील सिमावर्ती गावांमध्ये सैनिकांचे कसे काम चालते, सैनिकांच्या काय भावना आहेत, हे युवा स्वयंसेवकांनी जाणून घेतले. तसेच सामान्य नागरिक म्हणून आम्ही तुमच्यासोबत आहोत, हे सांगत सैनिकांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न आम्ही केल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading