Sunday, September 27, 2026
Latest NewsPUNE

‘रायमुनिया ‘ हा निर्मळ इंद्रियानुभव : अभिनेता गिरीश कुलकर्णी यांचे मत

पुणे : ‘निसर्ग,भवताल आणि आपलं अस्तित्व या अनुभवातून मोडक यांनी कथांच्या माध्यमातून रस निर्मिती केली आहे. अशी अभिव्यक्ती साकारायला जीवन समृद्ध असावे लागते. या कथा चित्रपटांचेच विषय आहेत. त्यात इंद्रियानुभव आहे,निर्मळ अभिव्यक्ती आहे. काळाच्या पटलावर गोंदून ठेवावं असं काम त्यांनी अभियांत्रिकी, पाटबंधारे खात्यात करुन ठेवलं आहे.तीच चुणूक या हळव्या कथासंग्रहात दिसते, ‘ असे प्रतिपादन अभिनेता, दिग्दर्शक गिरीश कुलकर्णी यांनी केले.

कोयना आणि राज्यातील महत्वाच्या पाटबंधारे प्रकल्पांवर योगदान देणारे अभियंता दीपक नारायण मोडक यांच्या
‘रायमुनिया ‘ या कथासंग्रहाचा प्रकाशन समारंभ  प्रसंगी गिरीश कुलकर्णी बोलत होते. यावेळी दिग्दर्शक उमेश कुलकर्णी , पत्रकार समीरण वाळवेकर , ज्येष्ठ चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी, राजहंस प्रकाशनाचे संपादक डॉ. सदानंद बोरसे उपस्थित होते.

उमेश कुलकर्णी म्हणाले, ‘ व्यक्त होते तीच व्यक्ती असते. दीपक मोडक यांनी शासकीय सेवेत वावरताना संवेदनशीलता, अभिव्यक्ती जपली आहे. त्यांच्या कथांना जिवंत खरेपणा आहे. व्यापक सार्वकालिक सत्याकडे या कथा निर्देश करतात. लिहिणारे नवे अनुभव घेत नाहीत, नवे अनुभव घेणारे लिहित नाहीत. पठडीबाज मांडणी सोडून साहित्यात नवीन काही आले पाहिजे, ही गरज हा कथासंग्रह पूर्ण करतो.

चंद्रमोहन कुलकर्णी म्हणाले, ‘ दीपक मोडक यांच्या कथा चित्रकलेच्या जवळ जाणाऱ्या बोलक्या आहेत.

डॉ. समीरण वाळवेकर म्हणाले, ‘ आशय हाच महत्वाचा असतो, किंग असतो, तो पुस्तक रुपात येणं ही महत्वाची प्रक्रिया असते. हा तपश्चर्येचा भाग असतो. लेखक, चित्रकार, प्रकाशन याचे सुंदर रसायन या कथासंग्रहाच्या निमित्ताने जुळून आले आहे. नोकरशाहीच्या नीरस वातावरणात जपलेली संवेदनशीलता,हळूवारपणा या कथातून दिसतात. ही सर्जनशीलता वाचकांना कथासंग्रह वाचनाकडे खेचून घेतील. हे अस्सल मराठी शब्द सौष्ठव आहे. त्यात ताकदवान दृश्यात्मकता आहे. या लिखाणात वैश्वीक आयाम आहेत. शारवी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading