Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी अभाविप साधणार प्राध्यापक, संस्था चालक व शिक्षणतज्ञांशी संवाद

पुणे : संपूर्ण देशात मागील दोन वर्षापासून कोविड महामारीच्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालय बंद आहेत. महाराष्ट्रात देखील सर्वत्र महाविद्यालय बंद होते.परंतु या काळात देखील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विद्यार्थ्यांच्या या विविध समस्यांना अभाविपने वेळोवेळी वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु राज्य शासन विद्यार्थ्यांच्या या समस्यांबाबत मुग गिळून गप्प बसले आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिली जाणारी शैक्षणिक वर्ष २०१८-१९, २०१९-२०,२०२०-२१ व २०२१-२२ ची शिष्यवृत्ती प्रलंबित आहेत. अभाविपने याबाबत वेळोवेळी प्रशासनाला निवेदन देऊन देखील विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काची शिष्यवृत्ती आजतागायत प्राप्त झाली नाही.

राज्य शासनाने घोषित केल्याप्रमाणे आज पासून राज्यात सर्वत्र महाविद्यालय सुरु केले जाणार आहेत. परंतु अनेक महाविद्यालयांनी याबाबत कोणतीही भूमिका घेतली नाही. विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना प्राप्त झाल्या नाहीत. तसेच शासकीय वसतिगृह ज्यामध्ये समाजकल्याण व आदिवासी आयुक्तालयाच्या माध्यमातून चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहांच्या प्रवेश प्रकीयेबाबत कोणत्याही सूचना शासनाने अद्याप जारी केल्या नाहीत. महाविद्यालय सुरु झाल्यावर ग्रामीण व जनजाती भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांनी निवास कोठे करावा ? हा मोठा यक्षप्रश्न उभा राहीला आहे. कोविड काळात शैक्षणिक शुल्क कमी करण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती परंतु या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याचा विसर शासनाला पडला आहे.

संपूर्ण राज्यात आरोग्य भरती हा एक चर्चेचा विषय बनला आहे. आरोग्य भरतीची संपूर्ण प्रक्रिया हि पूर्णतः संशयास्पद आहे. तब्बल तीन वेळा आरोग्य भरतीची परीक्षा रद्द करण्याची नामुष्की राज्य शासनावर ओढवली. या प्रकारामुळे परीक्षार्थी उमेदवारांना आर्थिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले आहे. या संपूर्ण गोंधळाची जबाबदारी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वीकारून आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा व परीक्षेचे काम दिलेल्या संबधित न्यास या कंपनीची चौकशी करून त्या कंपनीवर कार्यवाही करावी.

अनेक महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया चालू आहे. परंतु पालक व विद्यार्थ्यांना महाविद्यालयात योग्य वागणुक मिळत नाही. कोरोना आजाराचे कारण सांगितले जाते. याचा मानसिक त्रास विद्यार्थी व पालक यांना होत आहे. अनेक विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे निकाल लावले नाहीत, त्यामुळे P.hd, उच्चशिक्षण व नोकरीसाठी विद्यार्थ्यांना अडचण निर्माण होत आहे. राज्य सामाईक परीक्षा (CET) वेळापत्रक वारंवार उशिरा लावले जात आहे व त्यामध्ये अनेक बदल होत आहेत. त्याची विद्यार्थ्यांना कल्पना देण्यात येत नाही.संपूर्ण राज्यात शिक्षण क्षेत्रात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे व राज्य शासन मात्र याबाबत अजिबात गंभीर नाही.

“ विद्यापीठामध्ये कमवा व शिका योजना, NSS विभाग तसेच स्वायत्त महाविद्यायातील विविध समस्या,महाविद्यालयात विद्यार्थिनी सुरक्षा, प्रवेश प्रक्रिया व परीक्षा यांमध्ये सुसूत्रता येण्याची आवश्यकता आहे.” असे मत अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी व्यक्त केले आहे. तसेच प्राध्यापक,संस्थाचालक व शिक्षणतज्ञ यांना प्रत्यक्ष भेटून संवाद साधून COVID-19 मुळे उदभवलेल्या विविध शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी अभाविप येत्या काळात प्रयत्न करणार आहे. असे लटपटे यांनी आज पत्रकार परिषदेत बोलतांना सांगितले.

Leave a Reply