Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

जीडीपीच्या ६ टक्के खर्च शिक्षणावर करावा – शां. ब. मुजुमदार

पुणे: “ज्या देशात शिक्षण व आरोग्यसेवा उत्तम मिळते, तो देश विकसित समजला जातो. आपल्या देशात शिक्षणावर एकूण जीडीपीच्या अधिकाधिक ३.५ टक्के खर्च होतो. तो खर्च ६ टक्केपर्यंत करणे गरजेचे आहे,” आपल्या देशात शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असल्याचे मत सिम्बॉयोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष शां. ब. मुजुमदार यांनी व्यक्त केले.

खडकी शिक्षण संस्थेअंतर्गत वैदेही दत्ताजी गायकवाड यांच्या नावाने इंग्रजी माध्यमातील कनिष्ठ महाविद्यालय उभारण्यात येत आहे. त्याच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचे भूमीपूजन नुकतेच मुजुमदार आणि खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. या वेळी खडकी छावणी परिषदेचे उपाध्यक्ष दुर्योधन भापकर, ताराचंद रुग्णालयाच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष दत्ताजी गायकवाड, वैदेही गायकवाड, खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मानद अध्यक्ष ऍड. एस. के. जैन, उपाध्यक्ष अनिल मेहता, सचिव आनंद छाजेड, सहसचिव शिरीष नाईकरे आदी उपस्थित होते.

मुजुमदार म्हणाले, “अनेक व्यवसायांपैकी शिक्षण हा एक व्यवसाय. मात्र, हा व्यवसाय इतर सर्व व्यवसायांची जननी आहे. या क्षेत्रात गायकवाड कुटुंबीयांनी चिरंजीव चेतन गायकवाड यांच्या स्मरणार्थ इंग्रजी माध्यमातील शाळा बांधली. दहावी पास झाल्यानंतर अकरावीत प्रवेश मिळणे कठीण होते. म्हणून या कनिष्ठ महाविद्यालयाची पायाभरणी केली. या विद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळेल. त्यातून कर्तबगार नागरिक तयार होतील, हा विश्वास आहे.”

दत्ता गायकवाड म्हणाले,” खेडेगावात जन्माला आलो, तिथेच वाढलो. शिक्षण घ्यायला पैसे नसलेल्या मुलांना वडील पैसे द्यायचे. हा उपजत वारसा मिळाला. मी डॉक्टर व्हावे. गावात दवाखाना काढावा, अशी त्यांची इच्छा होती. तेच मनावर बिंबवले गेले. प्रेम विवाह केला. त्यास घरून विरोध झाला. काही काळ पुण्यात नोकरी केली. नंतर उद्योगात आलो. उद्योग विस्तारला. मला शिक्षण पूर्ण करता आले नाही म्हणून मुलाने ते पूर्ण करावे, अशी इच्छा होती. मात्र तो हे अकाली सोडून गेला. त्याचे आणि आमचेही स्वप्न अपूर्ण राहिले. ते पूर्ण करण्याचा प्रयत्न या सामाजिक कार्यातून करीत आहे. यात पत्नी वैदेही खांभिरपणे पाठीशी उभी राहिली. म्हणून मुलाच्या नावे शाळा बांधल्यानंतर आता वैदेहीच्या नावाने हे कनिष्ठ महाविद्यालय बांधीत आहे.”

बापट म्हणाले, ” उद्योजक गायकवाड यांचे कार्य अत्यंत मौल्यवान आहे. पैसेवाले खुप आहेत. ते महत्वाचे नाही, तर त्या पैशांचा समाजासाठी काय उपयोग करता येईल, हे महत्वाचे आहे. समाजात माणुसकी वाढावी, यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या माणसांत गायकवाड कुटुंबीय प्रथम स्थानी आहेत.  देश, समाज, धर्म सांभाळून समाजसेवा करण्यात त्यांचा खारीचा वाटा आहे, याची नोंद इतिहासात होईल.”

 

Leave a Reply