पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक – युनायटेड स्पोर्ट्स क्लबचा डेक्कन जिमखाना संघावर दणदणीत विजय
पुणे : पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित चौथ्या पीवायसी गोल्डफिल्ड राजू भालेकर स्मृती करंडक निमंत्रित 19 वर्षाखालील गटाच्या तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत श्रीराज चव्हाण(6-45)याने केलेल्या भेदक गोलंदाजीसह आदित्य राजहंस(166 धावा व 7-18)याने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाने डेक्कन जिमखाना संघाचा एक डाव व 185 धावांनी पराभव केला.
लोणी क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत काल पहिल्या दिवशी युनायटेड स्पोर्ट्स क्लब संघाने 71.4षटकात सर्वबाद 339धावा केल्या. आज डेक्कन जिमखानाच्या डावापासून खेळास सुरुवात झाली. युनायटेड स्पोर्ट्स क्लबच्या आदित्य राजहंस(18-7), समर्थ वाबळे(10-2), निमिर जोशी(15-1)यांच्या भेदक माऱ्यापुढे डेक्कन जिमखाना संघाचा डाव 18.5षटकात अवघ्या 45धावावर कोसळला. यात रुद्रज घोसले 24, प्रताप जोरी 12 यांनी थोडासा प्रतिकार केला. युनायटेड स्पोर्ट्स क्लबने डेक्कन जिमखाना संघावर फॉलोन लादला. फॉलोन लादल्यावर दुसऱ्या डावातही डेक्कन जिमखाना संघाचा डाव 40.5षटकात 109धावावर संपुष्टात आला. यामध्ये अथर्व सणस 21, क्रिश शहापुरकर 20, अथर्व वणवे 19, रुद्रज घोसले 12 यांनी धावा केल्या. युनायटेड स्पोर्ट्स क्लबकडून, श्रीराज चव्हाण(45-6), निमिर जोशी (46-4)यांनी सुरेख गोलंदाजी करत संघाला एक डाव व 185 धावांनी विजय मिळवला.
पीवायसी मैदानावरील तीन दिवसीय लढतीत दुसऱ्या दिवशी प्रथम फलंदाजी करताना ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी संघाने आपला डाव 135षटकात 7बाद 538धावावर घो षित केला. आज ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमीच्या 93षटकात 3बाद 335धावापासून खेळ पुढे सुरु झाला. यात देव नवलेने 192चेंडूत 26चौकार व 3षटकाराच्या मदतीने 155 धाव केल्या. त्यानंतर ओम खटावकरने 428चेंडूत 27चौकार व 2षटकाराच्या मदतीने नाबाद 208धावा चोपल्या. ओमला साहिल औताडेने 116चेंडूत 13चौकार व 1षटकारासह 102 धावांची खेळी करून चांगली साथ दिली. या दोघानी पाचव्या गड्यासाठी 234चेंडूत 179 धावांची भागीदारी करून संघाला मोठे आव्हान उभारण्यास मदत केली. याच्या उत्तरात पीवायसी हिंदू जिमखाना संघाने आज दिवस अखेर 47.5 षटकात 6बाद 163धावा केल्या. यामध्ये रिषभ रानडेने 107चेंडूत 11चौकार व 2षटकाराच्या 73धावा केल्या. त्यानंतर गुरवीर सिंग सैनी नाबाद 29धावा, यश खळदकर नाबाद 23 धावांवर खेळत आहे. पहिल्या डावात पीवायसी संघ अजून ३७५ धावांनी पिछाडीवर आहे. पीवायसी व ब्रिलियंटस स्पोर्ट्स अकादमी यांच्यातील अजून एक दिवसाचा खेळ शिल्लक आहे.
