Tuesday, July 28, 2026
Latest NewsPUNE

तारा मोबाईल क्रेशेसच्या वतीने कोविड -१९ मार्गदर्शक तत्त्वे आणि पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन 

पुणे : तारा मोबाईल क्रेशेसमधील मुले आणि कामगार समुदायाचे स्वयंसेवक यांनी तयार केलेल्या कोविड -१९ मार्गदर्शक तत्त्वे आणि पोस्टर यांच्या प्रदर्शनाचा अनोखा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. रोहन बिल्डर यांच्या वाघोली येथील रोहन अभिलाषा या बांधकाम प्रकल्पावर याचे आयोजन करण्यात आले होते. कोविड प्रतिबंधक उपाय लहान मुलांसोबतच संबंधित बांधकाम कामगार समुदायांपर्यंत पोहोचावेत या विचाराने सर्वानी एकत्र येत या मानक कार्यप्रणाली (SOP) तयार केल्या होत्या.

पुणे महानगर पालिकेच्या समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त रंजना गुगे या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते सदर मार्गदर्शक तत्त्वे आणि पोस्टर यांचे उद्घाटन करण्यात आले. क्रेडाई पुणे मेट्रोच्या कामगार कल्याण समितीच्या संयोजिका सपना राठी, क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर, कामगार कल्याण अधिकारी समीर पारखी, रोहन बिल्डर्स अँड डेव्हलपर्सच्या सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) विभागाच्या सल्लागार मंजुषा दोशी, टीडीएच फंडींग एजन्सीचे चंदन देसाई, तारा मोबाईल क्रेशेसच्या संचालिका निशा मेहता व मुख्य कार्यकारी अधिकारी प्रणिता मडकईकर आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

तारा मोबाईल क्रेशेस ही पुण्यातील एक स्वयंसेवी संस्था असून गेल्या चार दशकांपासून आपल्या डे केअर सेंटरद्वारे संस्थेच्या वतीने बांधकाम प्रकल्पावर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांच्या सर्वांगीण विकासास प्रोत्साहन देण्यासाठी काम केले जाते. कोविड साथीच्या काळात, आरोग्य, स्वच्छता, मास्क घालणे आणि सामाजिक अंतराच्या दृष्टीने कोविड प्रतिबंधात्मक उपायांचा सराव करणे आदी बाबींवरील संस्थेच्या वतीने भर देत जागृती करण्यात आली आहे. तारा मोबाईल क्रेशेस, पुणे येथे कॉम्प्युटर एडेड लर्निंग सेंटर – बस (सीएएलसी) आहे जे मुलांना खेळ आणि कॉम्प्युटर- आधारित गेमद्वारे मजेदार पद्धतीने तंत्रज्ञानाची ओळख करून देते. सीएएलसी बसने महामारीच्या काळात कोविड -१९ वर जागरूकता निर्माण केली. क्रेडाई –पुणे मेट्रोच्या माध्यमातून इतर प्रकल्पावरील मुलांपर्यत अशा अभिनव उपक्रमातून पोहचण्याचा संस्थेचा मानस आहे. नुकत्याच पार पडलेल्या या कार्यक्रमात एकूण ९ पोस्टर्सचे अनावरण करण्यात आले असून ही सर्व पोस्टर्स व एसओपी शहरातील विविध बांधकाम प्रकल्पांवर प्रदर्शित करण्यात येतील.

सदर कार्यक्रमासाठी रोहन बिल्डर्स अँड डेव्हलपर्स व टीमचे विशेष सहकार्य लाभले त्यासाठी निशा मेहता यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading