fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

कन्नड संघाच्या वतीने दसरा महोत्सव साजरा

पुणे  : गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातील कन्नड संघाच्या वतीने दसरा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत असते. याही वर्षी संघाच्या वतीने एरंडवणे येथील डॉ. कलमाडी श्यामराव हायस्कूल, प्रायमरी आणि कन्नडा मिडीयम येथे पारंपारिक दसरा व गोंबे महोत्सव आयोजित करण्यात आला होता. संघाचे विश्वस्त कै. गुंडुराज एम शेट्टी यांच्या सन्मानार्थ यावर्षी त्यांच्या नावे कलमाडी हायस्कूल येथे पहिल्या मजल्यावरील सभागृहाचे नूतनीकरण करीत त्याचे कै. गुंडुराज एम शेट्टी सभागृह असे नामकरण देखील या निमित्ताने करण्यात आले.

कन्नड संघाचे अध्यक्ष कुशल हेगडे, उपध्यक्षा इंदिरा सालियान, सचिव मालती कलमाडी, खजिनदार ए श्रीनिवास अल्वा, विश्वास्त बालाजित शेट्टी, शशिकला गुरपूर, विश्वस्त व कै. गुंडुराज एम शेट्टी यांची सून देविका शेट्टी, कै. गुंडुराज एम शेट्टी यांच्या पत्नी यशोदा शेट्टी, मुली नीना राय, मैना शेट्टी, नैना शेट्टी, सुना निवेदिता शेट्टी, नातवंडे आणि पुण्यातील बंट्स संघाचे अध्यक्ष संतोष शेट्टी आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

या वेळी बोलताना कुशल हेगडे म्हणाले, कन्नड संघाच्या स्थापनेपासूनच संघाच्या वाटचालीत कै. गुंडुराज एम शेट्टी यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. पुण्यात आलेल्या कर्नाटकमधील मजुरांच्या मुलांना उत्तम दर्जाचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मिळावे यासाठी त्यांची तळमळ आणि प्रयत्न वाखाणण्याजोगे होते. भविष्याची दृष्टी आणि सर्वांना एकत्र घेत काम करणारे असे त्यांचे व्यक्तीमत्त्व होते. आज त्यांच्या सन्मानार्थ या सभागृहाचे नामकरण करताना त्यांच्या आठवणी कायमस्वरूपी जपण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही करीत आहोत.

कार्यक्रमाच्या निमित्ताने यशोदा शेट्टी यांचा विशेष सन्मान कन्नड संघाच्या वतीने व कुशल हेगडे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी इंदिरा सालियान यांनी देखील कै. गुंडुराज एम शेट्टी यांच्या आठवणींना उजाळा दिला. कुशल हेगडे यांनी प्रास्ताविक केले तर मालती कलमाडी यांनी उपस्थितांचे आभार मानले. पूजा पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading