पुढील दोन दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, विदर्भ, मारठवाड्याला ‘यलो अलर्ट’
पुणे: राज्यासाठी पुढील दोन दिवस महत्त्वाचे असणार आहेत कारण पुढील दोन दिवसात राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील दोन दिवस विदर्भ,मराठवाडा,उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भ, मारठवाड्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील दोन दिवस होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना देखील सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आला आहे. ६ ऑक्टोबरपासून परतीच्या पावसाचा सुरुवात झाली आहे. याच दरम्यान बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे परतीचा महाराष्ट्र आणि ईशान्येकडील काही राज्यात जोरदार पाऊस होणार आहे.
पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहू शकतो त्यामुळे आज नाशिक, धुळे, जळगाव,परभणी,नंदूरबार,हिंगोली, नांदेड,जालना,वाशिम,अकोला,अमरावती,नागपूर,यवतमाळ,वर्धा,चंद्रपूर तसेच गडचिरोली, भंडारा,गोंदिया,औरंगाबाद,बीड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
