विज्ञान साहित्यात कविता व नाटक का लिहिले जात नाही? – राजेंद्र बनहट्टी यांचा सवाल

पुणे : १९६० च्या दशकामध्ये आणि त्यानंतरही बरेच विज्ञान साहित्याचे लेखक उदयाला आले. पण त्या सगळ्यांचा भर हा विज्ञान कथा आणि कादंबऱ्या, लिहिण्यावर होता आणि आहे. विज्ञानावर आधारित नाटक आणि काव्य  याकडे फारसे कुणी वळलेले दिसत नाही. त्यामुळे मराठी साहित्यात विज्ञान नाटक आणि काव्य हे अभावानेच आढळते. विज्ञान नाटक आणि काव्य का लिहिले गेले नाही याचा विज्ञान लेखकांनी शोध घ्यावा. असे मत साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष आणि साहित्यिक राजेंद्र बनहट्टी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने, उत्कृष्ट ग्रंथनिर्मितीसाठीचा सुविचार प्रकाशन मंडळ  पुरस्कृत ‘कै. पुष्पा पुसाळकर स्मृती पुरस्कार’ राजहंस प्रकाशनाच्या ‘समग्र जयंत नारळीकर’ (लेखक जयंत नारळीकर) या ग्रंथाला राजेंद्र बनहट्टी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, राजहंस प्रकाशनाचे डॉ. सदानंद बोरसे, उपाध्यक्ष राजीव बर्वे, चैतन्य बनहट्टी, बंडा जोशी, उद्धव कानडे, दीपक करंदीकर, उपस्थित होते.

बनहट्टी म्हणाले, ‘विज्ञान नाटक आणि काव्य यांचे लेखन झाल्यास  मराठीतील विज्ञान साहित्य जे काहीसे एकांशी आणि एकसुरी झाले आहे ते अधिक परिपूर्ण आणि समृद्ध होईल.  लेखकाच्या आणि प्रकाशकाच्या सांस्कृतिक सहकार्यातूनच समाजाचं प्रबोधन होत असते. लेखकाचे लिखाण प्रकाशित करणारा प्रकाशक या प्रबोधनाच्या प्रक्रियेत लेखकाइतकीच महत्त्वाची आणि अपरिहार्य भूमिका बजावत असतो. म्हणून या दृष्टीने पाहिले तर प्रकाशक हा पुस्तकांचा व्यापार, व्यवहार किंवा विपणन करणारा निव्वळ व्यावसायिक नसतो तर तो एकप्रकारे लेखकाप्रमाणेच समाजाचा प्रबोधनकार असतो.

बोरसे म्हणाले, ‘मुद्रितशोधनाकडे मराठी प्रकाशन व्यवहाराचे दुर्लक्ष होत असून मुद्रितशोधनाची दर्जेदार व्यवस्था निर्माण करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेतला पाहिजे. या गंभीर विषयावर मराठीतील सर्व प्रकाशकांनी एकत्र येऊन चिंतन केले पाहिजे.

Leave a Reply

%d bloggers like this: