पुण्यात 2 वर्षानंतर होणार दिवाळी पहाट कार्यक्रम


पुणे:राज्य शासनाने नाट्यगृहांमध्ये आणि खुल्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास परवानगी दिले आहेत. या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने उद्यानांमध्ये दिवाळी पहाट घेण्याचे अर्ज आल्यास सकारात्मक विचार करण्याचे सूतोवाच केले आहे. यामुळे यंदा दिवाळी पहाटचे कार्यक्रम घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

दरवर्षी दिवाळीमध्ये विविध संस्थांकडून दिवाळी पहाटच्या माध्यमातून सांगिताचे कार्यक्रम आयोजित केले जातात. हे कार्यक्रम नाट्यगृहांसह शहरातील विविध उद्यानांमध्ये आयोजित केले जातात. यामध्ये सारसबागेत कार्यक्रम घेण्यास संस्थांकडून प्राधान्य दिले जाते. शहरात 2018 मध्ये सारसबाग, पु.ल. देशपांडे उद्यानातील जॅपनीज गार्डन, तळजाई उद्यान, एरंडवणे येथील ताथवडे उद्यान, सोमवार पेठेतील शाहू उद्यान, लोहिया नगरमध्ये डॉ. राम मनोहर लोहिया उद्यान आदी ठिकाणी 10 ते 15 कार्यक्रम झाले होते.

मात्र कोरोनाच्या संकटामुळे गतवर्षी उद्याने व नाट्यगृहांमध्ये दिवाळी पहाटचे कार्यक्रम घेण्यास परवानगी देण्यात आली नव्हती. अनेक संस्थांनी आपला वर्षानुवर्षे सुरू असलेला पायंडा न मोडता ऑनलाईन पद्धतीने दिवाळी पहाटचे कार्यक्रम आयोजित केले होते. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर शासनाकडून टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथिल करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या आठवड्यात माध्यमिक शाळांसह महाविद्यालये आणि खासगी क्लासेस सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर नाट्यगृहे, चित्रपट गृहे सुरू करण्यासही परवानगी दिली आहे. या आदेशामध्ये नाट्यगृहांसह मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यास परवानगी दिली आहे. या पार्श्भूमीवर दिवाळी पहाटचे कार्यक्रम होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या अनुषंगाने महापालिका प्रशासनाने दिवाळी पहाटचे कार्यक्रम घेण्यासंदर्भात संबंधीत संस्था आणि व्यक्तीकडून अर्ज प्राप्त झाल्यास सकारात्मक विचार करण्याचे सूतोवाच महापालिका अतिरीक्त आयुक्त रविंद्र बिनवडे आणि उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे यांनी केले आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: