कोरोना काळात खऱ्या अर्थाने स्त्रियांमध्ये आदीशक्तीचे रूप दिसले – आमदार माधुरी मिसाळ

पुणे: नवरात्रोत्सवात आदीशक्ती नऊ दिवस राक्षसाशी लढते. त्यावेळी नऊ दिवस देवीचा जागर केला जातो. राक्षसाला हरविण्याची शक्ती तिच्यात आहे. हे ती आपल्याला दाखवून देत असते. तसेच कोरोना काळात देखील घरातील आर्थिक परिस्थिती ढासळली असताना घरातील प्रत्येक व्यक्तीला धैर्याने उभे करण्याची ताकद महिलांनी दाखविली. त्याचबरोबर समाजातील अनेकांना मदत केली. डॉक्टर, परिचारीका, नगरसेविका, पोलीस, कचरावेचक अशा अनेक महिला आपले घर सांभाळून इतरांसाठी पुढे आल्या. त्यामुळे कोरोना काळात खऱ्या अर्थाने स्त्रियांमध्ये आदीशक्तीचे रूप दिसले असे मत आमदार माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केले.

सह्याद्री सेवा प्रतिष्ठान, नगसेविका स्मिता वस्ते व विनोद वस्ते यांच्यावतीने घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२१ चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी रा. स्व. संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, नगरसेविका स्मिता वस्ते, विनोद वस्ते, नगरसेविका सरस्वती शेंडगे आदी मान्यवर उपस्थित होते. शिरीष देशपांडे, राजेंद्र तावडे, मोहित झांजले, किरण सोनीवाल, सुमित अहिरेकर, अजय आवळे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या स्पर्धेमध्ये एकूण ३४७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

गणपती सजावट स्पर्धेत अथर्व जोशी प्रथम, सुमित पवार द्वितीय आणि किरण झगडे याने तृतीय क्रमांक पटकाविला. तर गौरी सजावट स्पर्धेत मधुमालती घावरे प्रथम, चैत्राली खुटवड द्वितीय आणि वैशाली कानडे तृतीय क्रमांक पटकाविला.

स्मिता वस्ते म्हणाल्या, गेल्या दोन वर्षात लोकांना गौरी गणपती मोठ्या स्वरूपात साजरे करता आले नाही. त्यामुळे यंदाच्यावर्षी या सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. अशा स्पर्धांमुळे आपली भारतीय संस्कृती जपण्याचा आणि ती पुढील पिढीमध्ये रुजविण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. या स्पर्धामुळे महिलांना देखील रोजचे काम नव्याने करण्याची उर्मी मिळते, असे ही त्यांनी सांगितले. 

Leave a Reply

%d bloggers like this: