मोठी बातमी – अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी ठाकरे सरकारकडून १० हजार कोटींचे पॅकेज जाहीर

मुंबई : राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. विशेष म्हणजे एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता ठाकरे सरकारकडून ही तात्काळ मदत जाहीर करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण  यांनी चर्चा करून मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भात घोषणा केली. राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले आहे. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता १० हजार कोटींचे अर्थसहाय्य (पॅकेज) जाहीर करण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

या वर्षी जून ते ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भ आणि माराठवाड्याला अतिवृष्टी, पूर  व मुसळधार पावसाने जोडपले आहे. माराठवाड्याने तर कधी नव्हे ते कित्तेक पट अधिक पाऊस यंदा पाहिला. येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले आहे. राज्यभरातून शेतकरी ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी करीत आहेत. तसेच शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून जाहीर झालेली ही मदत शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरणार आहे.

 ही मदत पुढीलप्रमाणे – 

  • जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर
  • बागायतीसाठी १५  हजार रुपये प्रति हेक्टर
  • बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर

       ( ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येईल) 

Leave a Reply

%d bloggers like this: