पुण्याची सांस्कृतिक ओळख जपण्यात आणि वाढवण्यात जयंतराव टिळक यांची महत्त्वाची भूमिका – डॉ. दीपक टिळक
पुणे ः पुण्याची सांस्कृतिक ओळख जपण्यात आणि वाढवण्यात ज्येष्ठ नेते जयंतराव टिळक यांची महत्त्वाची भूमिका होती. आयुष्यभर त्यांनी गरजूंना मदत केली. लोकमान्यांचा निष्काम कर्मयोग त्यांनी आचारणात आणला, असे प्रतिपादन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक यांनी केले.
पुणे पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिष्ठानचे संस्थापक तसेच विधानपरिषदेचे माजी सभापती कै. जयंतराव टिळक यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त विशेष कार्यक्रम झाला. या समारंभात ते बोलत होते. श्रमिक पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमाला टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. दीपक टिळक व ज्येष्ठ संपादक अरविंद व्यं. गोखले प्रमुख पाहुणे होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर, कार्यवाह गजेंद्र बडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर आणि सरचिटणीस डॉ. सुजित तांबडे उपस्थित होते.
डॉ. टिळक म्हणाले, गोवा व संयुक्त महाराष्ट्र चळवळ, खासदार, आमदार, सभापती अशी विविध पदे दादांनी भूषविले. निसर्गाशी खूप प्रेम होते. लोकमान्यांचा वारसा त्यांनी खूप समर्थपणे सांभाळला. त्यांना लहानपणी केसरीवाडा सोडून जावे लागले. 11 वर्षे आश्रिता सारखे राहावे लागले तरी त्यांच्या मनात कोणाबद्दल राग नव्हता.
राजकारण, समाजकारण, पत्रकारिता अशा विविध माध्यमातून दादांनी लोकांची कामे केली. संघर्ष आणि अडचणींना सामोरे जाऊन त्यांनी अनेक संस्था, संघटना उभ्या केल्या. अनेक संस्थांचे ते आधारस्तंभ होते. त्या अर्थाने ते ‘संस्थानिक’ होते. राजकारणी, सभापती कसा असला पाहिजे, हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, मुंबईतील सावरकर भवन, पुणे पत्रकार भवन या संस्था उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे.
गोखले म्हणाले, शैली आणि भाषेतील प्रखरपणा जराही कमी होऊ न देता संपादकाने संपादकाच्या भाषेत कसे लिहिले पाहिजे आणि पत्रकारांनी सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून कसे लिहावे, याचे संस्कार जयंतराव टिळकांनी केले. त्यांच्यामुळे आम्ही लिहिते झालो.
अमुक प्रसंगावेळी लोकमान्यांनी कसा विचार केला असता आणि त्यांनी काय लिहिले असते, याची जयंतराव नेहमी आठवण करून द्यायचे. त्यांनी संपादकांच्या शब्दाला महत्त्व आणि आकार देण्याचे काम केले. अनेक संस्था त्यांनी वाढवल्या. पुणे शहर घडवण्याचे काम केले. संयुक्त महाराष्ट्र आणि गोवा मुक्तिसंग्राम लढ्यात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांची मुलूखमैदानी तोफ अनुभवताना ते प्रति टिळक भासायचे. ते माणुसकी जपणारे वादळ होते.
