Good news : 2 ते 18 वयोगटासाठी मुलांसाठी कोव्हॅक्सीन लशीला मान्यता
नवी दिल्ली : भारतात लसीकरण मोहीमेने वेग घेतला असून आज लसीकरण मोहीमेतील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेली एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. दोन ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सीन लसीचा वापर करण्यात यावा, अशी शिफारस सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने DCGI कडे केली आहे. त्यामुळे आता लहान मुलांच्या लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला असून लवकरच लसीकरणाला सुरूवात होईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान, यापूर्वी भारतात 12 वर्षांहून अधिक वय असलेल्या मुलांना केवळ ‘झायडस कॅडिला’च्या लसीलाच आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळालेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भारतात 2-18 वयोगटासाठी कोव्हॅक्सीन लशीला मान्यता देण्यात आली आहे. या लसीच्या दोन डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर ठेवावे लागेल. औषध नियामकांनी या वर्षी मे महिन्यात भारत बायोटेकला मुलांवर चाचण्या घेण्याची परवानगी दिली होती. ही चाचणी सप्टेंबरमध्ये पूर्ण झाली. 6 ऑक्टोबर रोजी कंपनीने पडताळणी आणि आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी डेटा CDSCO ला सुपूर्द केला. ही लस प्री फिल्ड सिरिंज असणार आहे. त्यातही 0.5 मिलीचा डोस असेल. 2 वर्षांपर्यंतच्या मुलांच्या बाबतीत, जास्त डोसमुळे समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून मुलांच्या लसीसाठी PFS यंत्रणेवर जोर देण्यात आला.
दरम्यान, पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट 7 ते 11 वयोगटातील मुलांसाठी अमेरिकेची कंपनी नोवावॅक्सच्या लसीवर संशोधन करत आहे. कंपनीनं भारतात या लसीचं नाव कोवावॅक्स ठेवलं आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) सीरम इंस्टीट्यूटला 7 ते 11 वयोगटातील मुलांवरील लसीच्या ट्रायलसाठी परवानगी दिली आहे. कंपनीने ही ट्रायल देशभरातील 100 मुलांवर केली आहे. मात्र या लसीच्या आपत्कालीन वापराला देशात अद्याप तरी मंजुरी मिळालेली नाही.
Bharat Biotech has submitted data from clinical trials in the 2-18 years age group for COVAXIN (BBV152) to CDSCO. The data has been thoroughly reviewed by the CDSCO and Subject Experts Committee (SEC) and has provided their positive recommendations. pic.twitter.com/NGySZlmNXD
— ANI (@ANI) October 12, 2021
