Thursday, July 30, 2026
Latest NewsPUNE

पुणेकरांना लस देणा-या सेवकांचा महालक्ष्मी मंदिरातर्फे सन्मान

पुणे : कोविड रुग्णांची संख्या कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे लसीकरण. महाराष्ट्रात लसीकरणात अग्रभागी असलेल्या पुणेकरांना लस देणा-या महापालिकेतील महिला सेवकांचा गौरव श्री महालक्ष्मी मंदिरातर्फे करण्यात आला. शासकीय सेवेत पूर्णवेळ कार्यरत नसूनही या महिला सेवकांनी केलेल्या कार्याला मंदिरातर्फे सलाम करण्यात आला. तसेच देवीची आरती देखील या महिलांच्या हस्ते झाली.

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवात पुणेकरांना लस देणा-या ११ महिला सेवकांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन मंदिरात करण्यात आले होते. यावेळी पुणे मनपा आरोग्य अधिकारी डॉ.अंजली साबणे, विमलाबाई अग्रवाल, प्राजक्ता जाधव, मंदिराचे विश्वस्त तृप्ती अग्रवाल, प्रविण चोरबेले, भरत अग्रवाल, हेमंत अर्नाळकर आदी उपस्थित होते. ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम झाला.

डॉ.अंजली साबणे म्हणाल्या, संख्यात्मक व गुणात्मक अशा पद्धतीने कोणत्याही कामाची मोजणी केली जाते. लसीकरणाचे काम जरी संख्यात्मक दृष्टीने मोठया स्वरुपात झाले असले, तरी देखील गुणात्मक पद्धतीने देखील झाले आहे. लसीकरण करताना मनपा सेवकांनी नागरिकांना अत्यंत आपुलकीने सेवा दिली आहे. पुणे मनपाचा केवळ आरोग्यविभाग केवळ याकामी नव्हता, तर सर्वच विभाग कार्यरत होते.

प्रविण चोरबेले म्हणाले, कोविड काळात आणि आता देखील दररोज २०० ते ३०० नागरिकांना लस देण्याचे कार्य प्रत्येक लसीकरण केंद्रावर केले जात आहे. लसीकरणाची अत्यंत महत्वाची जबाबदारी असून नागरिकांची आपुलकीने विचारपूस करुन या सेविका लसीकरण करत आहेत. सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये असेच चांगले काम करणारे सेवक असणे गरजेचे आहे. अशा सेवकांना महापालिकेने पूर्णवेळ कर्मचारी म्हणून नियुक्त करावे. श्री महालक्ष्मी मंदिराच्या वेबसाईट http://www.mahalaxmimandirpune.org यावरुन आॅनलाईन पूजा संकल्प तसेच फेसबुक पेज व युट्यूब तसेच स्थानिक केबलवर जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading