बौध्दांना संविधानिक ओळख मिळावी – भदन्त हर्षबोधी महास्थवीर
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्धधम्म परिषदेत महाचर्चा..
पुणे : केंद्र सरकारने १९९२ मध्ये बौध्दांना अल्पसंख्याक समुदायाचा दर्जा दिला आहे. मात्र, इतर अल्पसंख्याकांचे घटनात्मक अधिकार मिळाले नाहीत. महाराष्ट्रात 55 लाख बौद्धधर्मीय आहेत मात्र त्यांची संविधानिक ओळख नाही. राज्यात अनेकांनी जातीचा उल्लेख ‘नवबौध्द’ म्हणून केला आहे. तसेच नवबौध्द किंवा मूळ जातीची कागदोपत्री नोंद असल्याने बौद्ध धर्म स्वीकारला तरी त्याची नोंद आढळत नाही. परिणामी, जनगणनेत बौद्ध समुदाय कमी दिसतो. अॅट्रोसिटी कायद्याला कोणताही धक्का न लावता कायदेशीर मार्गाने बौद्धाची संविधानिक ओळख निर्माण करुन बौद्धांच्या अधिकारांसाठी पाठपुरावा करणे गरजेचे असल्याचे मत परिषदेचे अध्यक्ष भदन्त हर्षबोधी महास्थवीर (गया, बिहार) यांनी व्यक्त केले. धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त बौद्धधम्म परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते.
यावेळी अॅड. प्रमोद आडकर यांना ‘धम्मरत्न पुरस्कार’ देवून गौरव करण्यात आला. आंबेडकरी चळवळीला गतिमान करणा-या कार्यकर्त्यांचा व धम्म प्रचारकांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये बौध्द संस्कृतीचा वारसा असलेल्या लेणीचा शोध लावून त्याचे संवर्धन व स्वच्छता राखण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून प्रयत्न करणारे लेणी संवर्धन समितीचे पदाधिकारी दीपक गायकवाड आणि नागेश भोसले यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
बौद्धांची संविधानिक ओळख आहे का? या विषयावर परिषदेत महाचर्चा झाली. भिक्कू, उपासक नेमके कोण आहेत? त्यांची जीवनपद्धती कोणती आहे? असे अनेक विषय यावेळी कार्यक्रमात उलगडण्यात आले.
यावेळी पूज्य भदन्त हर्षबोधी महास्थवीर, भदन्त करुणाबोधी महाथेरो, भदन्त शाक्यपुत्र सागर थेरो, भदन्त धम्मानंद, भदन्त झेन मास्टर रवी मेधंकर, भदन्त झेन मास्टर सुदस्सन, भन्ते धम्मधर, विवेकवंत, अनिरुद्धो, राहुल, बुद्धघोष, काश्यप, हर्षवर्धन, अॅड. विवेकभाई चव्हाण, डॉ. अमोल देवळेकर, विठ्ठल गायकवाड आदी उपस्थित होते.
भदन्त हर्षबोधी महास्थवीर म्हणाले की, राज्य आणि देशामध्ये विविध ठिकाणी बुद्धिस्ट अल्पसंख्याक संविधानिक भिक्खू संघातर्फे जनजागृती करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित धर्माच्या स्वीकाराचे काम सुशिक्षित वर्गाने केले नाही. बौध्दांना अल्पसंख्याक दर्जा असला तरी अधिकारांचे स्वरुप जुने आहे. बौध्दांसाठी स्वतंत्र शाळा, महाविद्यालय अथवा रुग्णालये नाहीत.
