Thursday, July 30, 2026
Latest NewsPUNE

महालक्ष्मी मातेसमोर शालेय विद्यार्थ्यांचे ऑनलाईन श्रीसूक्त पठण

पुणे : श्री महालक्ष्मी माता की जय… या देवी सर्वभूतेषु, शक्तीरुपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:… या देवी सर्वभूतेषु, बुद्धीरुपेण संस्थिता, नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:… असे देवीमंत्राचे स्वर निनादले आणि देवीभक्तीचा जागर विद्यार्थ्यांनी केला. सामुहिक श्रीसूक्त पठणाच्या निमित्ताने विविध शाळांतील शेकडो विद्यार्थ्यांनी आॅनलाईन पद्धतीने श्रीसुक्त पठणात सहभाग घेत कोरोनासारखी सर्व संकटे समूळ नष्ट व्हावी, याकरीता श्री महालक्ष्मी देवी चरणी साकडे घातले.

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र महोत्सवात आॅनलाईन पद्धतीने सामुहिक श्रीसूक्त पठणाचा कार्यक्रम झाला. यावेळी मंदिराच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, विश्वस्त नगरसेवक प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, रमेश पाटोदिया यांसह शाळांतील विद्यार्थी व भाविक सहभागी झाले होते. विश्वकर्मा विद्यालयाच्या संगीता शितोळे आणि सौ. देशमुख यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहभाग घेतला. सुमारे १४ हजार विद्यार्थ्यांनी या उपक्रमाकरीता नावनोंदणी केली होती. प्रातिनिधीक स्वरुपात निवडक विद्यार्थ्यांनी मंदिरातून व इतरांनी घरबसल्या कार्यक्रमात सहभाग घेतला.

अमिता अग्रवाल म्हणाल्या, श्री सूक्त हे ॠग्वेदातील वैदिक सुक्त आहे. अतिशय दिव्य व फलदायी सुक्त आहे. श्रीसूक्त पठणाने केवळ धनच नाही, तर ऐश्वर्य, श्रीमंती, आरोग्य व मन:शांती मिळते, त्यामुळे सामुहिक श्रीसूक्त पठण दरवर्षी केले जाते. बुद्धीची देवता श्री महासरस्वती माता, ऐश्वर्याची माता श्री महालक्ष्मी माता आणि शक्ती देत अन्यायाविरुद्ध लढा देण्याची शिकवण देणा-या श्री महाकाली मातेचे नमन आपण नवरात्रामध्ये करतो. विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा, हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी गर्दी टाळून आॅनलाईन दर्शन घ्यावे. व्हिआयपी व अतिमहत्वाची व्यक्तींसाठी प्रवेशाची स्वतंत्र व्यवस्था बंद करण्यात आली आहे. ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांना मदत करण्याकरीता उत्सवातील निधी वापरण्यात येणार आहे. श्री महालक्ष्मी मंदिराच्या वेबसाईट http://www.mahalaxmimandirpune.org यावरुन आॅनलाईन पूजा संकल्प तसेच फेसबुक पेज व युट्यूब तसेच स्थानिक केबलवर जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading