Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNE

भाजपचा उधळलेला वारू राष्ट्रवादी व समविचारी पक्ष रोखणार – संजोग वाघेरे पाटील

पिंपरी : हिंद कामगार संघटना (इंटक) च्या माध्यमातून डॉ. कैलास कदम यांनी कामगार क्षेत्रात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मागील सात वर्षात कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे नेतृत्व करीत असताना पुणे जिल्ह्यातील शेकडो संघटीत व असंघटीत कामगार संघटनांना एकत्र करुन त्यांनी वेळोवेळी रस्त्यावर उतरुन शेतकरी व कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. डॉ. कैलास कदम यांनी सभागृहात विरोधी पक्ष म्हणून सक्षम भूमिका बजावली आहे. मागील सार्वत्रिक निवडणूकानंतर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आली. भाजपचा उधळलेला वारू राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, शिवसेना आणि मित्र पक्ष एकत्र येऊन रोखू आणि भाजपला सत्तेतून पायउतार करु असे प्रतिपादन संजोग वाघेरे पाटील यांनी केले.

डॉ. कैलास कदम यांची पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी डॉ. कदम यांच्या कार्यालयात जाऊन त्यांचे  अभिनंदन केले. यावेळी शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, फझल शेख, माजी नगरसेवक अरुण बो-हाडे, ॲड. गोरक्ष लोखंडे, शशिकांत देशमुख,  माधव पाटील तसेच शाम अगरवाल सर्जेराव जगताप, सचिन आवटे आदी उपस्थित होते. 

यावेळी संजोग वाघेरे पाटील म्हणाले की, देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या हस्ते भूमिपुजन झालेल्या ही औद्योगिक नगरी नव्वदच्या दशकानंतर वेगाने विकसित होत आहे. स्व. खासदार आण्णासाहेब मगर यांच्या नेतृत्वाखाली पाच गावांचे एकत्रीकरण करुन स्थापन झालेल्या नगरपालिकेने आता जगात ‘पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्मार्ट सिटी आणि मेट्रो सिटी’ म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आदरणीय लोकनेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहराचा राष्ट्रवादीने सर्वांगिण विकास केला आहे. माजी मंत्री प्रा. रामकृष्ण मोरे यांचेही योगदान आहे. आजपर्यंत या शहरातील राजकारणात गावकी – भावकीचे वर्चस्व राहिले आहे. याला अपवाद ठरेल अशी कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी कामगार नेते डॉ. कैलास कदम यांची शहर कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. याचा कॉंग्रेससह समविचारी पक्षांना निश्चितच फायदा होईल. 

Leave a Reply