Tuesday, August 4, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

क्रूझ ड्रग प्रकरण – NCB ने भाजप पदाधिकाऱ्याच्या मेव्हण्यासह तिघांना सोडले – नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई :  क्रूझ ड्रग प्रकरणावरुन सध्या राज्यात राजकारण सुरु झाले आहे.  नवाब मलिक यांनी एनसीबीकडून क्रूझवर करण्यात आलेली कारवाई ही बनावट असल्याचे सांगत भाजपाचे काही पदाधिकारी या सर्व प्रकारामध्ये सहभागी होते असा गंभीर आरोप केला आहे. त्याचबरोबर ताब्यात घेतलेल्या व्यक्तींपैकी तिघांना सोडून देण्यात आलेले आहे. त्यातला एक व्यक्ती भाजपाच्या पदाधिकाऱ्याचा मेहुणा आहे, असा दावा मलिकांनी केला होता. त्यांनी आता या भाजपा पदाधिकाऱ्याचे नाव जाहीर केले आहे.

आपल्या आरोपांसंदर्भातले पुरावे सादर करण्यासाठी नवाब मलिकांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी अनेक खुलासे केले. ते म्हणाले, एनसीबीच्या समीर वानखेडेंनी सांगितलं की, ८ ते १० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र खरं म्हणजे ११ जणांनाच ताब्यात घेण्यात आले होते. त्यातल्या तिघांना सोडून देण्यात आले आहे. रिषभ सचदेवा, प्रतिक गाबा, आमिर फर्निचरवाला अशी सोडून दिलेल्या व्यक्तींची नावं आहेत. त्यापैकी प्रतिक गाबा आणि आमिर फर्निचरवाला यांचे नाव सुनावणीदरम्यान आले आहे.

या दोघांच्या बोलावण्यावरुनच आर्यन खान तिकडे गेला होता. आमचा एनसीबीला प्रश्न आहे की, १३०० लोकांच्या जहाजावर आपण छापा टाकलात. त्यापैकी ११ जणांना ताब्यात घेतलं, त्यांची चौकशी केली. मात्र ज्या तीन लोकांना तुम्ही सोडलं, त्याचे आदेश तुम्हाला कोणी दिले? आमच्या माहितीनुसार, दिल्ली ते महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यांनी या तिघांना सोडण्याचा आदेश दिला.

या ड्रग्ज प्रकरणात ज्या तीन लोकांना सोडण्यात आलं, त्यापैकी एक भाजपाच्या पदाधिकाऱ्याचा मेहुणा आहे, असा आरोप मलिक यांनी याआधीही केला होता. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी या नेत्याचं नाव जाहीर केलं आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, सोडून दिलेल्या तिघांपैकी रिषभ सचदेवा हा भाजपा मुंबईचे माजी सरचिटणीस मोहित कंबोज उर्फ मोहित भारतीय यांचा मेहुणा आहे.

मलिक यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केले होते. आर्यन खान व अरबाज मर्चंट यांच्या अटकेच्या वेळी के .पी. गोसावी व भाजपाचे पदाधिकारी मनीष भानुशाली हे दोघे उपस्थित होते व त्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाली आहेत. भाजपाच्या पदाधिकाऱ्याच्या राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाशी (एनसीबी) संबंध काय आहे? असा सवाल त्यांनी केला होता.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading