पवार कुटूंबियांवरील छापे म्हणजे राजकीय षडयंत्र – संजोग वाघेरे पाटील
पिंपरी : रोजच वाढत्या महागाईमुळे देशभरातील नागरिकांमध्ये केंद्र सरकार विरोधात तीव्र असंतोष आहे. तसेच दिल्लीतील शेतक-यांच्या आंदोलनात वाहने अंगावर घालून त्यांना चिरडून ठार करण्यात आले. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. याकडे माध्यमांचे लक्ष जाऊ नये या उद्देशाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी व कार्यालयात आयटीचे छापे टाकण्यात आले. मोदी सरकारने सुरु केलेली ही कारवाई राजकीय षडयंत्र आहे अशी टिका पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केली.
गुरुवार पासून आयटी विभागाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी व कार्यालयात छापे टाकले आहेत. याचा निषेध करण्यासाठी आज पिंपरीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यामध्ये आमदार आण्णा बनसोडे, माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, विनोद नढे, राहुल भोसले, भाऊसाहेब भोईर, महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर, शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी महापौर योगेश बहल, अपर्णा डोके, मंगला कदम, डॉ. वैशाली घोडेकर, युवक शहराध्यक्ष विशाल वाकडकर, युवक प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वरपे, विशाल काळभोर, नगरसेवक अजित गव्हाणे, अतुल शितोळे, मोरेश्वर भोंडवे, अनुराधा गोफणे, पौर्णिमा सोनवणे, निकीता कदम, पंकज भालेकर, राजू बनसोडे, सुलक्षणा धर, अरुण पवार आदी उपस्थित होते.
आमदार आण्णा बनसोडे यावेळी म्हणाले की, भाजपच्या आजी माजी मंत्र्यांचेही साखर कारखाने व इतर उद्योग, व्यवसाय आहेत. त्यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई नाही. पुरोगामी महाराष्ट्रात औद्योगिक व सामाजिक क्रांती घडविणारे लोकनेते शरद पवार यांनी लखीमपूर येथिल शेतकरी आंदोलनावर टिपणी केली. त्याचा बदला घेण्यासाठी केंद्र सरकारने ही कारवाई केली.
माजी आमदार विलास लांडे या कारवाईबाबत केंद्र सरकारवर टिका करताना म्हणाले की, केंद्राची ईडी व आयटी हे मोदी, शहा यांचे घरगडी असल्याप्रमाणे काम करत आहेत. मोदी, शहा यांच्या ईशा-यावर डोंबा-याच्या खेळाप्रमाणे वागत आहेत. राजकारणातून समाजकार्य कसे करावे याचा आदर्श म्हणजे लोकनेते शरद पवार आणि अजित पवार हे आहेत. त्यांच्या कुटूंबियांना त्रास देऊन महाराष्ट्रातील राजकरण विस्कळीत करण्याचा भाजपाचा कुटील डाव आहे.
