Wednesday, November 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

काहीही संबंध नसताना माझ्या तीन बहिणींच्या घरावर आयकर विभागाच्या धाडी का? – अजित पवार

भाजप खालच्या पातळीचे राजकारण करीत आहे 

मुंबई : आयकर विभागाने आज अजित पवार यांच्याशी संबंधीत साखर कारखाने आणि त्यांच्या तीन बहीणींच्या मालमत्तांवर धाडी टाकल्या. यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. ते म्हणाले,  माझ्याशी संबंधित कारखान्यांवर धाड टाकली त्याचं मला काही वाटत नाही. पण माझ्या बहिणींच्या मालमत्तांवर देखील धाड टाकण्यात आली आहे. काहीही संबंध नसताना त्यांच्या मालमत्तांवर धाडी टाकण्याच कारणच काय? अनेक सरकार आली आणि गेली पण कुणी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करतं हे मला आजपर्यंत कळालेल नव्हतं,” असे अजित पवार म्हणाले.

आज सकाळी आयकर विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील काही कारखान्यांवर छापे टाकले. तसेच अजित पवारांंच्या पुण्यातील दोन बहिणी आणि कोल्हापूर येथील बहिणीच्या कार्यालयावर धाड टाकली आहे. अजित पवार यांची बहीण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशन हाऊसवरही आयकर विभागाची झाडा झडती सुरू आहे. आयकरच्या चार अधिकाऱ्यांकडून मुक्ता पब्लिकेशनमध्ये कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. विजया पाटील यांच्या कोल्हापुरातील घरावर देखील आयकर विभागाची धाड पडली आहे.  

यावर अजित पवार प्रतिक्रिया देताना म्हणाले,  “माझ्याशी संबंधित कारखान्यांवर धाड टाकली त्याबद्दल मला काही म्हणायचे नाही. पण मला एका गोष्टीचं दु:ख आहे की ज्या माझ्या तीन बहिणी ज्यांची ३५-४० वर्षांपूर्वी लग्न झाली आणि त्या चांगल्या पद्धतीने संसार करत आहेत. त्या तीन बहिणींवर एक कोल्हापूरमधील बहिणीवर आणि दोन पुण्यातील बहिणींवर त्यांनी धाडी टाकल्या. या धाडीमागचं कारण मला समजू शकलेल नाही. कारण त्या त्यांचं जीवन जगतायत, त्यांच्या मुलांची लग्न झाली आहेत, त्यांची नातवंड आहेत. असं असताना अजित पवार यांचे नातेवाईक म्हणून धाड टाकली असेल तर राज्याच्या जनतेने या गोष्टीचा जरुर विचार केला पाहिजे. कुठल्या स्तारावर जाऊन आज या वेगवेगळ्या संस्थांचा राजकारणासाठी वापर केला जातो आहे. भाजप खालच्या पातळीचे राजकारण करीत आहे.” 

Leave a Reply