fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

पीएमपीएमएल कडून हडपसर ते मोरगाव नवीन बसमार्ग सुरू

पुणे :  पीएमपीएमएल कडून मार्ग क्रमांक २१२ हडपसर ते मोरगाव हा नवीन बस मार्ग सुरू करण्यात आला. बारामतीच्या नगराध्यक्षा मा. पौर्णिमाताई तावरे यांच्या हस्ते मोरगाव येथे या बससेवेचे उदघाटन करण्यात आले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य दिलीप खैरे, पंचायत समिती सदस्य  हनुमंत भापकर, मोरगावचे सरपंच निलेश केदारी, पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक  दत्तात्रय झेंडे, हडपसर डेपो मॅनेजर सुभाष गायकवाड, असिस्टंट डेपो मॅनेजर   मोहन दडस,  पोपट तावरे, माजी सरपंच  किसन जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

मार्ग क्रमांक २१२ – हडपसर ते मोरगाव या बस सेवेचा मार्ग हडपसर, भेकराईनगर, भाडळे वस्ती, वडकी नाला, दिवेगाव, किर्लोस्कर कंपनी, वाघिरे कॉलेज, सासवड, विर फाटा, पुरंदर पेट्रोल पंप, खळद फाटा, शिवरी, वाळुंज फाटा, बेलसर फाटा, जेजुरी एसटी स्टँड, नाझरे फाटा, सीमलेस कंपनी, कोळविहीरे फाटा, मावडी, चोरवाडी, आंबी पाटी, कदम वस्ती/ ढोले मळा, मयुरेश्वर विद्यालय, मोरगाव असा असणार आहे. सध्या या बसमार्गावर ५ बसेस द्वारे दर पन्नास मिनिटांनी बस सेवा उपलब्ध असेल. सकाळी हडपसरहून पहिली बस ५.०५ वाजता व मोरगावहून पहिली बस ६.३० वाजता आहे. तर संध्याकाळी हडपसरहून शेवटची बस ९.३० वा. व मोरगावहून शेवटची बस ८.४५ वाजता आहे.

याप्रसंगी बोलताना बारामतीच्या नगराध्यक्षा  पौर्णिमा तावरे म्हणाल्या “पीएमपीएमएलने सुरू केलेल्या या बससेवेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची चांगली सोय झाली आहे. विशेषतः सासवड,जेजुरी, पुणे येथे शिक्षणासाठी जाणाऱ्या मुलींसाठी ही बस सेवा अत्यंत उपयुक्त आहे. तसेच या भागातील नोकरदार, व्यावसायिक यांना देखील पुणे शहरात जाण्या येण्याच्या दृष्टीने ही बस सेवा उपयुक्त ठरणार आहे आणि शेतकऱ्यांनाही त्यांचा भाजीपाला थेट पुण्यात नेता येणार आहे. याचबरोबर मोरगावचा गणपती हा अष्टविनायकांपैकी पहिला गणपती असल्याने देशभरातून याठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांचीही पुण्यातून थेट मोरगावला येण्याची चांगली सोय होणार आहे.”

पीएमपीएमएलचे वाहतूक व्यवस्थापक  दत्तात्रय झेंडे म्हणाले,” हडपसर ते मोरगाव या बस सेवेमुळे ग्रामीण भागातून पुणे शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची चांगली सोय होणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना दैनिक ४० रु.  मासिक ५०० रु. च्या पासद्वारे देहू, आळंदी, रांजणगाव, बालाजी मंदिर, प्रति शिर्डी अशा तीर्थक्षेत्रांची सफर करता येणे शक्य होणार आहे.”

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading