Thursday, November 19, 2026
Latest NewsPUNE

महालक्ष्मी मंदिरात घटस्थापना पुजेने नवरात्रोत्सवाला प्रारंभ

पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवाचा प्रारंभ घटस्थापना पुजेने झाला. ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल आणि प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल यांच्या हस्ते सकाळी घटस्थापनेची पूजा झाली. श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती व श्री महाकाली देवीच्या गाभा-यात फुलांची व विविधरंगी मखरांची आकर्षक सजावट करण्यात आली. गुरुवारी सर्वत्र मंदिरे खुली झाल्याने भाविकांनी घटस्थापनेच्या दिवशी सकाळपासून महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले.

घटस्थापनेला मंदिराचे विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, नगरसेवक विश्वस्त प्रविण चोरबेले, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, नारायण काबरा आदी उपस्थित होते. यंदा नवरात्र उत्सवानिमित्त पद्ममंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. घटस्थापनेला धार्मिक विधींचे मिलिंद राहुरकर यांनी पौरोहित्य केले.

ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, उत्सवात श्री सुक्त अभिषेक, श्री महालक्ष्मी महायाग, श्री दुर्गासप्तशती महायाग, सुप्रभातम् अभिषेक असे धार्मिक कार्यक्रम मंदिरामध्ये होणार आहेत. धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध क्षेत्रात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान, पोलीस खात्यातील महिलांचा सन्मान, कन्यापूजन, वीरमाता-पत्नींचा गौरव असे विविध सामाजिक कार्यक्रम देखील होणार आहे. कोविड व ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा यंदाचा नवरात्र उत्सव महालक्ष्मी मंदिरात साध्या पद्धतीने साजरा होणार आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने मंदिरामध्ये व बाहेरील बाजूस ३० ते ४० सीसीटिव्ही, खासगी सुरक्षारक्षकांची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. मंदिरातील सर्व पुजारी व कर्मचा-यांचे लसीकरण करण्यात आले आहे. तसेच सुरक्षेसाठी कोविड चाचण्या देखील करण्यात आल्या आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर मास्क बंधनकारक असून सॅनिटायझेशन देखील करण्यात येत आहे. भक्तांची तपासणी करण्याकरीता दोन आरोग्यसेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भक्तांच्या संरक्षणासाठी पाच कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. भाविकांच्या तातडीच्या उपचाराकरीता मंदिराशेजारील रुग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. यावर्षी देखील भाविकांनी गर्दी टाळून आॅनलाईन दर्शन घ्यावे. व्हिआयपी व अतिमहत्वाची व्यक्तींसाठी प्रवेशाची स्वतंत्र व्यवस्था बंद करण्यात आली आहे. ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांना मदत करण्याकरीता उत्सवातील निधी वापरण्यात येणार आहे. श्री महालक्ष्मी मंदिराच्या वेबसाईट www.mahalaxmimandirpune.org यावरुन आॅनलाईन पूजा संकल्प तसेच  फेसबुक पेज  व  युट्यूब तसेच स्थानिक केबलवर जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply