Tuesday, August 4, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राज्यात उद्यापासून मिशन कवच कुंडल अभियान

दररोज १५ लाखांहून अधिक लसीकरणाचे उद्दिष्ट – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई : राज्यातील कोविड-१९ लसीकरणाला आणखी गती यावी यासाठी 8 ऑक्टोबर ते 14 ऑक्टोबरपर्यंत ‘मिशन कवच कुंडल अभियान’ राबवण्यात येणार आहे. या अभियानात राज्यात दररोज 15 लाखांहून अधिक लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

टोपे यांनी या अभियानाबाबत आज माहिती दिली. टोपे यांनी सांगितले की, राज्यात ८ ते १४ ऑक्टोबर दरम्यान हे मिशन कवच कुंडल अभियान राबवले जाईल. केंद्र सरकारने १५ ऑक्टोबरपर्यंत देशभरात १०० कोटी नागरिकांना कोविड लस देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी अभियानाचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानात ग्रामीण आणि निमशहरी भागातील नागरिकांचे लसीकरण करण्यावर भर दिला जाणार आहे. अभियानाची अंमलबजावणी प्रभावी होण्यासाठी महसूल, ग्राम विकास, महिला व बाल विकास, शिक्षण, नगर विकास अशा विविध विभागांचा सहभाग घेतला जाणार आहे. अभियानासाठी सध्या राज्याकडे ७५ लाख लस उपलब्ध आहेत. आणखी २५ लाख लस उपलब्ध होणार आहेत.

राज्यातील सव्वा नऊ कोटी नागरिकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी सहा कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून आणखी सव्वातीन कोटी पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण शिल्लक आहे. अभियानाच्या कालावधीत जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचा उद्देश आहे. लसीकरणाचा वेग वाढावा यासाठी या अभियानात समाजातील विविध घटकांचा सहभाग घेतला जाणार आहे. त्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन, खाजगी डॉक्टर, रोटरी क्लब, लायन्स क्लब, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेतला जाणार आहे, असे टोपे यांनी सांगितले.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांच्या खात्यात मदत जमा होणार 

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या नातेवाईकांना ५० हजार रुपये मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनामुळे सुमारे १ लाख ४० हजार नागरिक मरण पावले आहेत. यासाठी एसडीआरएफ मधून सुमारे ७०० कोटी रुपयांचे तरतूद केली जाणार आहे. यासाठी पोर्टलवर जिल्हाधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना माहिती भरावी लागेल. त्यानंतर मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नातेवाईकांच्या खात्यात मदतीचे पैसे जमा होतील, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading