Tuesday, August 4, 2026
Latest NewsPUNE

भारतीय सेना ही कोणत्याही पक्षाची नसून भारतवासियांची सेना – लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त)

पुणे : सर्जिकल स्ट्राइक जेव्हा झाले होते, तेव्हा अनेकांनी भारतीय सेनेचे कौतुक केले. परंतु, त्याबरोबर अनेकांनी सर्जिकल स्ट्राइकबद्दल  प्रश्नदेखील उभे केले. काहींनी हा फार्स आहे, असे देखील म्हटले. भारतीय सेना ही कोणत्याही पक्षाची सेना नसून भारतीय नागरिकांची सेना आहे. भारतीय सेनेला दिलेले कोणतेही मिशन सेना शंभर टक्के यशस्वी करेल, असा विश्वास लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त) यांनी व्यक्त केला.

भारतमाता महिला मंडळ ट्रस्टच्या वतीने महिला आणि युवा स्वयंसेवक काश्मीरमधील १२०८ सैनिकांकरीता व १९२ नागरिकांकरीता दिवाळी फराळ प्रत्यक्ष घेऊन जाणार आहेत. या फराळाच्या पूजनाचा कार्यक्रम पर्वती पायथा येथील भारतमाता अभ्यासिकेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. यावेळी रा.स्व.संघ पुणे महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर, कर्नल महादेव घुगे, सामाजिक कार्यकर्ते गौरव त्रिपाठी, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, आयोजिका प्रियांका शेंडगे-शिंदे, हेमा शिंदे, हेमा तुंगुतकर, आरती पाटसकर, हेमलता अहिरे, सौ. थळपती व मंडळाच्या कार्यकर्त्या उपस्थित होते.

राजेंद्र्र निंभोरकर म्हणाले, स्वत:च्या कुटुंबांना सोडून राहणा-या सैनिकांना घरचा फराळ मिळाला, तर त्यांना आनंद होतो. सीमेवर लढणा-या सैनिकांना मिळणा-या कोणत्याही पदकापेक्षा त्यांना भारतीय नागरिकांनी त्यांच्या प्रती दाखविलेला अभिमान आणि कौतुकाची थाप अतिशय मोठी आहे. काश्मीरची स्थिती खूप वाईट होती. भारतीय सेनेच्या हातात अशांत काश्मीर आल्यावर  सन १९९६ नंतर काश्मीरमधील स्थिती नियंत्रणात यायला सुरुवात झाली.

रवींद्र वंजारवाडकर म्हणाले, भारतीय सैनिक सीमेवर आपल्या रक्षणासाठी लढत आहेत, परंतु अंतर्गत भारताच्या एकात्मतेला जी आव्हाने आहेत, ती आपल्यालाच पेलायची आहेत. जाती, धर्म, उपासनापद्धती याच्या पलीकडे जाऊन एकात्म भारत आपल्याला घडवायचा आहे. भारतीय सैनिकांचा जो त्याग आहे, त्याच्या प्रती आपण सर्वांनी कृतज्ञ राहायला हवे.

प्रियांका शेंडगे-शिंदे म्हणाल्या, भारतीय सैन्यदलातील जवान हे साहस व त्यागाने देशांच्या सिमांचे संरक्षण करतात. आपल्या परिवारापासून दूर राहून ऊन-वारा-पाऊस याची तमा न बाळगता ते अहोरात्र कार्यरत असतात. त्यांच्या या अपार देशकार्याला सलाम म्हणून आणि भारतीय नागरिक त्यांच्यासोबत आहेत, या भावनेतून त्यांच्यासोबत आपले सण-उत्सव साजरे करावे, याउद््देशाने काश्मीरमध्ये पुण्यातून २५ युवा स्वयंसेवक जाणार आहेत. रचना शिंदे व मृण्मयी परळीकर यांनी सूत्रसंचालन केले. सरस्वती शेंडगे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading