सोचू बाल पुस्तक संच प्रकाशित
पुणे : पूर्वी एकत्र कुटुंबात घरातील वयस्कर लोक मुलांना रुचतील आवडतील अशा गोष्टी सांगून त्यातूनच नैतिक मूल्यांची ओळख करून देत असत. वेगवेगळ्या बाल कथा, गोष्टींमधून मुलांवर संस्कार होत असत. परंतु आज परिस्थिती वेगळी आहे. सध्याच्या व्यस्त युगात मुलं इंटरनेट च्या विश्वात जास्त रमलेली पाहायला मिळत आहेत. अत्याधुनिक मोबाईल मधील खेळात हरवलेली दिसत आहेत. खरंतर मुलांना गोष्ट ही त्यांच्या ‘खाऊ’ इतकीच आवडत असते मग हा ‘खाऊ’ मनोरंजक आणि तितकाच पौष्टिक दिला तर हा विचार पुण्यातील तीन युवकांच्या मनात आला.
देवेन गांधी, विलास अलगूडे आणि चेतन व्होरा या तिघांना एकाच ध्येयाने ग्रासले होते ते म्हणजे मुलांच्या सर्वांगीण विकासा साठी काहीतरी केले पाहिजे जे अहिंसक आणि मुलांच्या मानसिक वाढी साठी उपयुक्त असेल. जेव्हा विचार केला तेव्हा मुलांसाठी च्या मुख्य प्रवाहातील मनोरंजनात वाचनाचा अभाव असल्याचे जाणवले. मुलांना इंटरनेट च्या विश्वातून दूर नेणे शक्य नाही परंतु वाचनात रुची उत्पन्न होईल असे काय करता येईल या विचारातून पुस्तक निर्मितीची संकल्पना पुढे आली आणि आत्ताच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सात वर्षाच्या ‘सोचू’ ची निर्मिती झाली त्या निमित्याने आयोजित पत्रकार परिषदेत चेतन गांधी यांनी सोचू च्या निर्मिती मागचा हेतू स्पष्ट केला.
या पत्रकार परिषदेला देवेन गांधी, विलास अल्गुडे उपस्थित होते.
सोचू म्हणजे विचार करणारा. जसे प्रत्येक प्राण्यामध्ये जगण्यासाठी एक विशिष्ट गुणधर्म असतात. पक्ष्यांना पंख असतात, माशांना कल्ले असतात, वाघांना पंजे असतात तसंच माणसामधे विचार करण्याची क्षमता असते. पुस्तकातला सोचू विचार करून त्याच्या समस्या सोडवतो. म्हणून सोचूच्या माध्यमातून आम्ही “विचार करणे प्रत्येकासाठी आहे आणि विचार करणे खूप मजेदार असू शकते” ही कल्पना रुजवू इच्छितो. सध्या सोचू कथासंचात देवेन, विलास आणि चेतन यांनी लिहिलेल्या बारा कथा आहेत ज्या आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत. सोचूच्या निर्मिती मागे मुलां मधे सकारात्मक बदल घडावा हा हेतू आहे. कार्टून मुलांच्या मनोरंजन विश्वाचा अविभाज्य भाग आहे त्या साठी सोचू पुस्तकाची निर्मिती सचित्र स्वरूपात करण्यात आली आहे.
