महालक्ष्मी मंदिरात धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा नवरात्रोत्सव श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागेच्यावतीने आयोजन
पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित शारदीय नवरात्र उत्सवाचा प्रारंभ गुरुवार, दिनांक ७ आॅक्टोबर पासून होणार आहे. दिनांक ७ ते १५ आॅक्टोबर दरम्यान धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध क्षेत्रात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान, पोलीस खात्यातील महिलांचा सन्मान, कन्यापूजन, वीरमाता-पत्नींचा गौरव असे विविध सामाजिक कार्यक्रम देखील होणार आहे. कोविड व ओल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा यंदाचा नवरात्र उत्सव महालक्ष्मी मंदिरात साध्या पद्धतीने साजरा होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला विश्वस्त नगरसेवक प्रविण चोरबेले, अॅड.प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल उपस्थित होते.
गुरुवारी (दि.७) सकाळी ९.३० वाजता ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. तसेच, सायंकाळी ७ वाजता मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद््घाटन व पहिली आरती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते होणार आहे. याशिवाय दहा दिवसात श्री सुक्त अभिषेक, श्री महालक्ष्मी महायाग, श्री दुर्गासप्तशती महायाग, सुप्रभातम् अभिषेक असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होणार आहेत.
अमिता अग्रवाल म्हणाल्या, कोविड काळात नायडू रुग्णालयात काम केलेल्या व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीद्वारे संवाद साधलेल्या परिचारिका छाया जगताप तसेच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सोनिया अग्रवाल-कोंजेटी, पल्लवी जैन यांचा गौरव देखील होणार आहे. यावेळी आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे उपस्थित राहणार आहेत. रविवारी (दि.१०) सकाळी ९ वाजता आॅनलाईन पद्धतीने श्री सुक्त पठण कार्यक्रम होणार आहे. यामध्ये पुण्यातील विविध शाळांतील १४ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
सोमवार (दि.११) कन्यापूजनाचा कार्यक्रम मंदिरात होईल. नृत्यांगना अभिनेत्री वैष्णवी पाटील यावेळी उपस्थित राहणार आहे. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य वर्षानिमित्त वीरजवान पत्नी व मातांचा सन्मान आणि आरती देखील होणार आहे. सुप्रभातम् अभिषेक. दररोज पहाटे ४ वाजता आणि दस-याच्या दिवशी ब्रह्ममुहूर्त मंगल उत्सव म्हणजेच गाभा-याचा दरवाजा उघडून मातेचे पहिले दर्शन भाविकांना मिळणार आहे. याशिवाय दररोज सकाळी ७:१५ वाजता व संध्याकाळी ७:१५ वाजता महाआरती होईल. भक्तांकरीता मंदिरात दर्शनाची वेळ सकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत असणार आहे. उत्सवाचे पौरोहित्य मिलिंद राहुरकर करणार आहेत.
