काश्मीरमधील १२०० सैनिकांकरीता पुण्यातून दिवाळी फराळ
पुणे : राष्ट्रहित सर्वप्रथम हे ध्येय समोर ठेऊन कार्यरत असलेल्या भारतीय सैनिकांप्रती ॠण व्यक्त करण्याकरीता पुण्यातील महिला आणि युवा स्वयंसेवक काश्मीरमधील १२०८ सैनिकांकरीता व १९२ नागरिकांकरीता दिवाळी फराळ घेऊन जाणार आहेत. दस-याचे शस्त्रपूजन सैनिकांसोबत करावे व दिवाळी फराळ सैनिकांना प्रत्यक्ष भेटून द्यावा, याकरीता पर्वती येथील भारतमाता महिला मंडळ ट्रस्टने हा उपक्रम हाती घेतला आहे, अशी माहिती ट्रस्टच्या प्रियांका शेंडगे-शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला मृणाल होनप, रचना शिंदे, मृण्मयी परळीकर, हेमा शिंदे, चैत्राली पद्मवार, राजाभाऊ शेंडगे, शर्वरी आपटे, आकाश मालोदे, मयूर पाटील आदी उपस्थित होते.
भारतीय सैन्यदलातील जवान हे साहस व त्यागाने देशांच्या सिमांचे संरक्षण करतात. आपल्या परिवारापासून दूर राहून ऊन-वारा-पाऊस याची तमा न बाळगता ते अहोरात्र कार्यरत असतात. त्यांच्या या अपार देशकार्याला सलाम म्हणून आणि भारतीय नागरिक त्यांच्यासोबत आहेत, या भावनेतून त्यांच्यासोबत आपले सण-उत्सव साजरे करावे, याउद््देशाने काश्मीरमधील मच्छल या भागात पुण्यातून २५ युवा स्वयंसेवक जाणार आहेत.
देशाच्या प्रत्यक्ष सिमेवर लढणा-या १४०० जवान व तेथील स्थानिक नागरिकांना दिवाळी फराळ किट देण्यात येणार आहेत. यामध्ये ५०० किलो लाडू, चिवडा, चकली, करंजी, शेव या पारंपरिक महाराष्ट्रीयन फराळाचा समावेश आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती व पुणेरी पगडी देखील तेथील लष्करी अधिका-यांना भेट देण्यात येणार आहे. या सर्व साहित्याचे पूजन गुरुवार, दिनांक ७ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पर्वती पायथा येथील भारतमाता अभ्यासिकेच्या प्रांगणात होणार आहे. कार्यक्रमाला लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर (निवृत्त), आमदार माधुरी मिसाळ, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
