Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

विद्यार्थ्यांना संधी देणारे व्यासपीठ म्हणजे विद्यापीठ – राजेश पांडे

पुणे : विद्यार्थी हा केवळ परीक्षार्थी बनू नये, याकरीता प्रयत्न व्हायला हवा. अभ्यासासोबत सर्वच क्षेत्रात तो कसा पुढे जाईल, यासाठी काम व्हायला हवे. केवळ परीक्षा घेणारे विद्यापीठ असू नये, तर विद्यार्थ्यांना सर्वच क्षेत्रात संधी देणारे व्यासपीठ म्हणजे विद्यापीठ असते, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे यांनी व्यक्त केले.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे शाहीर हिंगे युवा कलागौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र येथे करण्यात आले. यावेळी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका डॉ.मंजुषा कुलकर्णी, प्रबोधिनीचे अध्यक्ष शाहीर हेमंतराजे मावळे, प्रा.संगीता मावळे आदी उपस्थित होते. सांगली बुधगाव येथील युवाशाहीर प्रसाद विभूते, मयुरी विभूते यांना कलागौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अकरा हजार रुपये, सन्मानचिन्ह, मानाचा फेटा, मोत्याचा शिरपेच असे पुरस्काराचे स्वरुप होते. पुरस्कार वितरण सोहळ्याचे यंदा २२ वे वर्ष होते.
राजेश पांडे म्हणाले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे सांस्कृतिक वैभवाचे माध्यम आहे. यामाध्यमातून अनेक उपक्रम राबविण्याचा आम्ही प्रयत्न करतो. कला जीवंत ठेवण्यासाठी धडपडणारे लोक कमी असतात. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या माध्यमातून हे कार्य अव्याहतपणे सुरु आहे.
डॉ.मंजुषा कुलकर्णी म्हणाल्या, भारतीय कलांना संस्कृत भाषेचा आधार आहे. संस्कृत ही भारतीय जीवनशैलीचा आत्मा आहे. त्यामुळे संस्कृतचा अभ्यास करायला हवा. कोणत्याही कलाकाराच्या मागे त्याचे कुटुंब उभे असणे महत्वाचे आहे.  शेतकरी व लोककला जपणा-यांना आपण जपू शकलो नाही, तर या कला जीवंत राहणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, शाहिरीमध्ये पीएचडी करणा-या विद्यार्थ्यांना याविषयातील पुस्तके उपलब्ध नाहीत. त्यामुळे ही ग्रंथसंपदा निर्माण करण्यासाठी प्रबोधिनी प्रयत्न करणार आहे. शाहिरी परंपरा सकारात्मकपणे पुढे नेण्यास जे जे करता येईल, ते करु असेही त्यांनी सांगितले. युवाशाहीर प्रसाद विभूते व सहका-यांना पोवाडयाचा कार्यक्रम झाला. अरुणकुमार बाभुळगावकर, गणेश टोकेकर, सुरेश तरलगट्टी यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात सहभाग घेतला. अक्षदा इनामदार हिने सूत्रसंचालन केले. होनराज मावळे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading