राज्यात पुढील 48 तासात जोरदार पावसाची शक्यता
पुणे : मागील काही दिवसांपासून माराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्राला अतिवृष्टीने झोडपून काढले आहे. त्यातच राज्यात पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे पुढच्या 4,5 दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेलं शाहीनं चक्रीवादळ तीव्र झाले असून ते ओमन देशाच्या किनारपट्टीवर धडकले आहे. चक्रीवादळ किनापट्टीवर धडकल्यापासून देशात अनेक ठिकाणी पावसाने थैमान घातलाय. त्यामुळे हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे. विजा चमकताना कृपया बाहेरचे काम टाळा, त्या वेळी घराबाहेर पडू नका, त्यात जीवाला धोका असू शकतो. शक्यतो, अशा प्रकारचे तीव्र हवामान दुपार नंतर संध्याकाळी व रात्री पर्यंत असते, असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
