पारंपारिक वस्त्र संस्कृतीमध्ये खरे सौंदर्य दडलेले – सुप्रिया बडवे
पुणेः- भारतीय संस्कृती ही सर्वार्थाने प्रगत आहे. अनादीकाळा पासून कला, साहित्य, शिल्पकला, वस्त्र
अशा अनेक संस्कृतींमध्ये भारत इतर देशांपेक्षा प्रगत होता. राज्याराज्यांना लाभलेली भौगोलिक विविधता आणि भारतीय हवामान लक्षात घेता आपल्या पूर्वजांनी आपली वस्त्र संस्कृती आचरणात आणतांना खूप खोलवर आणि दूरदृष्टीने विचार केलेला दिसून येतो. आपल्या भारतीय पारंपरिक वस्त्र संस्कृतीमध्ये खरे सौंदर्य दडलेले असून भारतीय वस्त्र संस्कृती आजही पाश्यात्य देशांच्या कुतूहलाचा विषय ठरतो, असे मत बडवे इंजिनिअरींग कंपनीच्या संचालक सुप्रिया बडवे यांनी व्यक्त केले.
महात्मा गांधी यांच्या 152 व्या जयंती निमित्त खादी उत्पादक आणि विक्रते यांच्या व्यवसायाला चालना मिळावी तसेच भारताच्या खेडो-पाडी दडलेल्या पारंपारीक कलेला व्यासपीठा मिळावे म्हणुन भारतातील पारंपरिक कला, संस्कृती, वस्त्र संस्कृती, शिल्प संस्कृती आदी कलागुणांना एक व्यासपीठ मिळावे, या कलांशी संबंधित मूळ कलाकारांना प्रकाशझोतात आणावे ह्या उद्देशाने ‘छांदसी’ या उपक्रमा अंतर्गत आपटे रोड येथील श्रुती मंगल कार्यालयाच्या सभागृहात आज पासून सोमवार दिनांक 4 ऑक्टोबर पर्यंत असे तीन दिवसीय अभिजात अस्सल भूज कच्च येथील वस्त्र आणि पैठणींच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे, त्याचे उद्घाटन बडवे इंजिनिअरींग कंपनीच्या संचालक सुप्रिया बडवे यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर उपक्रमाच्या संयोजिका सुमित्रा भांडारी, राष्ट्रीय हातमाग विभागाकडे नोंदणीकृत आणि केंद्र शासनाचे गुणांकन लाभलेले भुज कच्छ येथील कलाकार,येवल्याचे पैठणी कलाकार मनोज दिवटे, भाजपाचे उपप्रदेशाध्यक्ष माधव भांडारी आदी मान्यवर उपस्थित होते.
सुप्रिया बडवे म्हणाल्या, भारतीय संस्कृती ही सर्वार्थाने प्रगत आहे. अनादीकाळा पासून कला, साहित्य, शिल्पकला, वस्त्र अशा अनेक संस्कृतींमध्ये भारत इतर देशांपेक्षा प्रगत होता.
उपक्रमाच्या संयोजिका सुमित्रा भांडारी म्हणाल्या, पुण्यात प्रथमच भूज कच्छ येथील दुर्मीळ, अस्सल वस्त्र प्रदर्शनासाठी मांडण्यात आली आहेत. या प्रदर्शनात पारंपारिक, रेशमी आणि हातमागावरील अस्सल अनेक प्रकारच्या भूज कच्छ येथील पारंपारीक वस्त्र तसेच पैठणी आदी प्रकार मांडण्यात आले आहेत. सोमवार दिनांक 4 ऑक्टोबर पर्यंत सकाळी 11 ते 9 या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.
