जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त जनसेवा फौंडेशनतर्फे मेळाव्याचे आयोजन
पुणेः- जनसेवा फाैंडेशनतर्फे जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त प्रतिवर्षी आयोजीत करण्यात येणारा ज्येष्ठ नागरिक मेळावा यंदाही कोविड मुळे ऑनलाईन पद्धतीने आयोजीत करण्यात आला असून यावर्षी सोमवार दि. ४ ऑक्टोबर, ६, ८, ९, ११, १३, १४ ऑक्टोबर सकाळी ११ ते १ यावेळेत साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती जनसेवा फौंडेशनचे अध्यक्ष डाॅ. विनोद शहा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवीले आहे.
हा कार्यक्रम सामाजिक न्याय व सबलीकरण केंद्रीय मंत्रालयाच्या आर. आर. टी. सी. व सामाजिक न्याय मंत्रालय महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजीत करण्यात येत आहे.
पहिल्या दिवशी ४ ऑक्टोबर रोजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्रकुमार यांच्या हस्ते उदघाट्न होईल. यादिवशी शंभरी पार केलेले तसेच आपल्या जीवनात उत्तुंग कार्य केलेले जेष्ठ नागरिक यांचा सन्मान करण्यात येईल. यामध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. बाबा आढाव, अभय फिरोदिया, डॉ. सुभाष साळुंके, ऋषितुल्य पंडित वसंतराव गाडगीळ आदींचा समावेश आहे. याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण पूर्व आशियाई विभागाच्या समन्वयक डॉ. नीना रैना उपस्थित राहणार आहेत. आय एफ. ए. चे सेक्रेटरी जनरल डॉ. जेन बॅरेट, खासदार डॉ.नरेंद्र जाधव यावेळी थोडक्यात मार्गदर्शन करणार आहेत.
६ ते १४ ऑक्टोबर दरम्यान माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, पद्मश्री डॉ.प्रकाश आमटे, डॉ.मंदाताई आमटे, अभिनेते विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर, विधान परिषद उपसभापती डॉ. निलमताई गोऱ्हे, डॉ. जब्बार पटेल, आशा काळे, लीला गांधी, प्रसिद्ध निर्माते सुभाष घई, खासदार वंदनाताई चव्हाण, खासदार गिरीशजी बापट, महापौर मुरलीधरजी मोहोळ हे सहभागी होणार आहेत व राज्याचे विविध सनदी अधिकारी जेष्ठांवरील विविध योजनांचा उहापोह करतील.
जागतिक जेष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने सप्ताह साजरा करणारी जनसेवा फौंडेशन हि एकमेव संस्था आहे.अस्कॉप, फेस्कॉम, नवचैतन्य हास्य योग्य परिवार, भारतीय योग्य संस्थान, पुणे विद्यापीठ , जेष्ठ नागरिक सेल, इंटरनॅशनल लॉन्जएटिव्हिटी सेंटर इंडिया ( ILCI ) एकता क्लब यांचा सहभाग असणार आहे. जेष्ठांच्या विविध आजारांवर व समस्यांवर उहापोह होणार असून महाराष्ट्र राज्याची एल्डर लाईन हेल्पलाईन १४५६७ यावर माहिती देण्यात येणार आहे.
