Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

विवेक वनारसे ठरला यंदाच्या ‘द ड्राईंग बोर्ड २०२१’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे विजेते

पुणे : वास्तुविद्या (आर्कीटेक्चर) क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या द ड्राईंग बोर्ड या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुण्यातील व्हीआयटीच्या पीव्हीपी कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचा विद्यार्थी विवेक वनारसे यांने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. स्पर्धेचे हे सहावे वर्ष असून यामध्ये भारतासह अमेरिका, स्पेन, इंग्लंड, चीन, कॅनडा सारख्या तब्बल २० हून अधिक देशातील सुमारे ७०० विद्यार्थी सहभागी झाले होते. बंगळूरू येथील माईंड स्पेस आर्किटेक्टस व पुण्यातील रोहन बिल्डर्स, या बांधकाम क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेतर्फे दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. पंढरपूरची वारी ही या वर्षीच्या स्पर्धेची संकल्पना होती.

नुकटेक ऑनलाईन पद्धतीने ही स्पर्धा पार पडली. यामध्ये विवेक वनारसेने प्रथम क्रमांक पटकाविला. तमिळनाडूच्या  सीएआरई (CARE) स्कूल ऑफ आर्किटेक्चरच्या जसवंत एन एस व राल्बीन वेनियल यांच्या संघाने द्वितीय तर पुण्याच्याच  महर्षी स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेन (BNCA)च्या अंकिता खलाटे, श्रेया जोशी व मैत्रेयी प्रभुदेसाई यांच्या संघाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.

बडोदा येथील मंडला डिझाईन सर्व्हिसेसचे सहसंस्थापक व अहमदाबादच्या सेंटर फॉर एन्व्हार्नमेंटल प्लॅनिंग अॅण्ड टेक्नोलॉजी (सीईपीटी)च्या फॅकल्टी ऑफ आर्किटेक्चरचे माजी प्रमुख आर्किटेक्ट नीलकंठ छाया, सिडनी – ऑस्ट्रेलियातील पीटर स्ट्रॅचबरी आर्किटेक्चरचे पीटर स्ट्रॅचबरी आणि सीआरआयटी व स्कूल ऑफ एन्व्हार्नमेंट अॅण्ड आर्किटेक्चरच्या सह संस्थापिका आर्किटेक्ट रुपाली गुप्ते यांनी स्पर्धेचे परिक्षक म्हणून काम पाहिले. यादरम्यान आळंदी देवस्थानचे प्रमुख चोपदार राजाभाऊ रणदिवे यांनी स्थापत्य व नियोजनाच्या दृष्टीकोनाच्या माध्यमातून वारी उपस्थितांसमोर उलगडून दाखविली.

विवेक वनारसे यांनी या स्पर्धेसाठी वारीच्या राहण्याची सोय होऊ शकेल अशा पद्धतीचे मोड्यूल विकसित केले होते. वारीच्या थांब्याच्या ठिकाणी यामध्ये वारी मुक्काम करू शकेल व वारी जशी पुढे जाईल तसे हे मोड्यूल वारी सोबत असेल अशा पद्धतीने ते बनविण्यात आले. शिवाय वारीच्या मुक्कामाच्या वेळापूर या गावातील ग्रामपंचायत कार्यालय व कुंडाचे देखील त्यांनी स्थानिक स्थापत्याच्या आधारे रेखांकन केले होते. यामध्ये  स्थानिक यादवकालीन स्थापत्यकलेचा अंतर्भाव करण्यात आलेला होता. लहानपणापासून वारीचे आकर्षण असल्यामुळे या संकल्पनेवर काम करताना एक प्रकारचे समाधान मिळाल्याचे वनारसे यांनी सांगितले. तसेच संतांची शिकवण आपल्या रेखाटनाद्वारे समाजासमोर आणण्याचा प्रयत्न केल्याचे आपल्याला समाधान आहे असेही  वनारसे यांनी नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading