भारताला ५ लाख कोटींची अर्थव्यवस्था बनविण्याच्या स्वप्नात वाहतूक उद्योग क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे – डॉ. महेंद्रनाथ पांडे
पुणे : नजीकच्या भविष्यात भारताला ५ लाख कोटींची अर्थव्यवस्था बनविण्याच्या दृष्टीने वाटचाल करीत असताना यामध्ये वाहतूक उद्योग क्षेत्राचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांनी केले.
पुण्यातील ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात एआरएआयच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सिंम्पोझियम ऑन इंटरनॅशनल ऑटोमोटिव्ह टेक्नॉलॉजी २०२१ (एसआयएटी २०२१) या प्रसिद्ध वाहन विषयक आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आज केंद्रीय अवजड उद्योग मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने झाले, त्या वेळी ते बोलत होते.
डॉ. पांडे यांच्या हस्ते या परिषदेदरम्यान आयोजित प्रदर्शनी, इलेक्ट्रिक वाहने, लहान मुलांची सुरक्षा, पादचारी सुरक्षा अॅक्टिव्ह सेफ्टी या विषयांवर भर असलेल्या ‘ग्लोबल ऑटोमोटिव्ह सेफ्टी रेग्युलेशन्स’ या पुस्तिकेचे देखील अनावरण करण्यात आले. अर्थव्यवस्था वाढीचे स्वप्न साकार करीत असताना तरुणांसाठी कौशल्याधारित रोजगार निर्मितीवर वाहतूक उद्योग क्षेत्राने भर द्यावा, असे आवाहन या वेळी डॉ. पांडे यांनी केले.
एआरएआयच्या वतीने आणि सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनीअर्स (एसएई) इंडिया व आंतराष्ट्रीय यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेल्या एसआयएटी २०२१ या परिषदेची ही १७ वी आवृत्ती असून यावर्षी ऑनलाईन पद्धतीने परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘रिडिफायनिंग मोबिलिटी फॉर फ्युचर’ ही यावर्षीच्या परिषदेची संकल्पना आहे. एआरएआयचे अध्यक्ष व मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी सी. व्ही. रमण, एसएई इंडियाच्या अध्यक्षा रश्मी उर्ध्वरेषे, एआरएआयचे संचालक डॉ. रेजी मथाई, एसआयएटी २०२१ चे संयोजक डॉ. सुकृत ठिपसे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
या वेळी बोलताना डॉ. पांडे म्हणाले, “वाहन उद्योग क्षेत्राची उत्पादन क्षमता, रोजगार निर्मिती व कमी किंमतीमध्ये प्रभावी निर्मिती करण्याचे कौशल्य लक्षात घेत वाहन उद्योग क्षेत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारत या उपक्रमामध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. अवजड उद्योग मंत्रालयाने देखील नुकतेच देशांतर्गत उत्पादनाला चालना देण्याच्या उद्देशाने एकूण योजनेच्या २५ टक्के इतकी २५ हजार ८०० कोटी रुपयांची प्रोडक्शन लिंक्ड इनसेंटिव्ह योजना ही केवळ वाहतूक उद्योगासाठी जाहीर केली आहे. नजीकच्या भविष्यात वाहन उद्योग क्षेत्राला जगाच्या पाठीवरील मॅन्युफॅक्चरिंग डेस्टिनेशन बनविण्याची पंतप्रधानांची योजना आहे. याबरोबर जीडीपीमधील या क्षेत्राचा वाटा हा सध्याच्या १४- १५% वरून २०- २५% नेण्याचे त्यांचे स्वप्न आहे.”
इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग प्रकल्पावर एआरएआयने केलेल्या कामाचे कौतुक करीत डॉ. पांडे म्हणाले, “कोविड काळात इतर क्षेत्राबरोबर वाहन उद्योग क्षेत्राला फटका बसला असला तरी आता हे क्षेत्र पुन्हा उभे राहत आहे, ही कौतुकाची बाब आहे. येत्या काळात मोबिलिटी अर्थात गतिशीलतेवर भर देणे महत्त्वाचे असून इलेक्ट्रिक हायड्रोजन वाहने, हरित वाहने, या क्षेत्रासाठी आवश्यक भागांची स्थानिक पातळीवर निर्मिती, पर्यायी इंधन, जैवइंधने, सीएनजी व इथेनॉल यांवर भर द्यायला हवा. वाहन क्षेत्राच्या या सर्व प्रयत्नांमध्ये सरकार सदैव पाठीशी उभे असेल याची खात्री बाळगा.”
सी. व्ही. रमण म्हणाले, “ १९८५ सालापासून सुरू झालेली एसआयएटी २०२१ ही वाहतूक उद्योग क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण परिषद म्हणून ओळखली जाते. वाहनउद्योग क्षेत्रातील संकल्पना, भविष्य, तांत्रिक प्रगती यांचा आढावा यामध्ये घेण्यात येतो. वाहन उद्योग क्षेत्र हे कॉस्ट सेन्सिटिव्ह मार्केट असून यामध्ये आणखी अनेक प्रकारचे संशोधन होणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने नुकतेच आणलेल्या प्रोडक्शन लिंक्ड इनसेंटिव्ह योजनेसोबतच स्थानिक पातळीवर कच्च्या मालाची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या पावलाचे आम्ही स्वागत करीत आहोत.”
