fbpx
Sunday, May 26, 2024
Latest NewsMAHARASHTRA

परभणी – ओला दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 50 हजार मदत द्या,अन्यथा आंदोलनाचा आनंद भरोसे यांचा इशारा

परभणी :  जिल्ह्यात यंदा सरासरी पेक्षा 144 टक्के जास्त पाऊस झाला असून मागील 5 दिवसांतील अतिवृष्टीने शेतकर्‍याचे संपूर्ण पीके नामशेष झाली आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करीत ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसकट हेक्टरी 50 हजार रूपयांची मदत द्यावी,यामागणीचे निवेदन मा.जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय शेळके,संघटन सरचिटणीस अँड.एन.डी.देशमुख,भाजपा मनपा गटनेत्या मंगल मुदगलकर,मनपा सदस्य सुनिल देशमुख, रितेश जैन,सरचिटणीस संजय रिझवानी,दिनेश नरवाडकर, भाजपा तालुकाध्यक्ष संदिप जाधव,चिटणीस अँड.गणेश जाधव,भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष उमेश शेळके,भाजपा वैद्यकीय आघाडी संयोजक डॉ. मनोज पोरवाल,गणेश देशमुख आदी भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

आठ दिवसात पंचनामे नाही झाले तर भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी दिला आहे. जिल्ह्यात यंदा पावसाचे आक्रमक रूप राहिले आहे. दि.11 व 12 जुलैला अतिवृष्टी, त्यानंतर 6 सप्टेंबरला पुन्हा अतिवृष्टी व परतीच्या पावसाऐवजी मागील पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने अतिवृष्टी व पुरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील दोन्ही अतिवृष्टीत प्रशासनाने दिलेले पंचनाम्याचे आदेश पुर्णत्वास येवू शकले नाहीत. तोच पीके वाढीच्या अवस्थेत व काही ठिकाणी काढणीच्या अवस्थेत असताना झालेल्या अतिवृष्टीने यंदाचा हंगाम शेतकर्‍यांच्या हातून जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोयाबीन बाजारपेठेत नेण्याऐवजी नदीच्या पुरात जाण्याची वेळ आली आहे. संपूर्ण शेत शिवारात पाणी झाले असून त्याचा निचराही होईनासा झाला आहे. परिणामी पीके हातची जाण्याबरोबरच शेतजमिनीची खरडणही मोठ्या प्रमाणावर झाली आहे. अनेक घरे पाण्याखाली बुडाली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील जनता अडचणीत सापडली आहे. आर्थिकदृष्ट्या शेतकरी हतबल झाल्याने शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी भाजपने केली आहे. शासनाने 29 ऑगस्ट 2019 रोजी पश्‍चिम महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यांसाठी विशेष बाब म्हणून हेक्टरी 40 हजार रूपये देण्याचा काढलेला अध्यादेश परभणी जिल्ह्यालाही लागू करून नुकसान लक्षात घेवून हेक्टरी 50 हजार रूपये मदत द्यावी, अन्यथा भाजपच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात येईल, असेही महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading