आनंदी मनोवृत्ती असेल, तर दु:ख विसरता येते – मकरंद टिल्लू
पुणे : आज सर्वत्र नकारात्मकता वाढत आहे. त्यामुळे आनंद पसरविणारे लोक आजूबाजूला असणे गरजेचे आहे. जीवंत रहायचे असेल, तर प्रत्येकाने हसायला हवे. मनाने अपंग असणा-यांना हसू येत नाही. त्याकरीता आपण प्रसन्न राहयला हवे. आपल्यामध्ये आनंदी मनोवृत्ती असेल, तर दु:ख विसरता येते, असे मत लाफ्टर योगा ट्रेनर व एकपात्री कलाकार मकरंद टिल्लू यांनी व्यक्त केले.
निरंजन सेवाभावी संस्थेतर्फे मॉडेल कॉलनी येथे झालेल्या कार्यक्रमात ईनेब्लर चॅरिटेबल ट्रस्ट या दिव्यांग क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या संस्थेच्या दिव्यांग सभासदांना चालण्याकरीता ५ व्हिलचेअर, ८ कुबडया व ४ वॉकर ही साधने देण्यात आली. तसेच १ लॅपटॉप देखील देण्यात आला. यावेळी संस्थेचे धीरज धूत, अजय झंवर, विनोद राठी आदी उपस्थित होते. या उपक्रमाला सीए आनंद जाखोटिया, पुनम जाखोटिया, पारख फार्मासिटीकलचे संदीप पारख यांनी विशेष सहकार्य केले आहे.
मकरंद टिल्लू म्हणाले, माणसाने पैसा कसा कमवावा, यापेक्षाही पैसा कसा चांगल्या पद्धतीने खर्च करावा, हे शिकणे महत्वाचे आहे. अनेकांकडे पैसा खूप असतो, मात्र गरजवंतांच्या चेह-यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता त्या व्यक्तींमध्ये असतेच असे नाही. निरंजन सेवाभावी संस्थेसारख्या सामाजिक संस्था हे कार्य अत्यंत उत्तम पद्धतीने करीत असून दिव्यांगांकरीता आशेचा किरण म्हणून काम करीत आहेत.
सीए आनंद जाखोटिया म्हणाले, दिव्यांगांना मदतीचा हात देण्याकरीता या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येकजण सुखी असेल, तरच तो निरोगी आयुष्य जगू शकतो. दिव्यांगांना अनेक समस्या आहेत, त्या दूर करण्याकरीता संस्थेने पुढाकार घेतला असून यापुढेही अनेक उपक्रम घेण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. अमोल शिंदे यांनी सूत्रसंचालन केले.
