कन्हैयाकुमार आणि जिग्नेश मेवानीच्या कॉँग्रेस प्रवेशामागे ‘पुणेरी हात’
पुणे : जेएनयू मधील विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार आणि गुजरातमधील युवा नेते जिग्नेश मेवानी लवकरच कॉँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. गुजरात मध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे या पार्श्वभूमीवर मेवानी यांच्या प्रवेशाला वेगाळे महत्वा आहे, तर कन्हैयाकुमार कडे बिहार मध्ये मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. या दोन बड्या युवा नेत्यांच्या कॉँग्रेस प्रवेशामागे ‘पुणेरी हात’ लपलेले असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली.
दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंदोलन आणि विद्यार्थी चळवळीमुळे कन्हैयाकुमार यांचे नेतृत्व उदयास आले. त्यांनी काही काळ भारतीय कम्युनिस्ट पक्षा मध्ये काम केले, बिहारमधुन लोकसभेची निवडणुकाही लढवली होती. तर जिग्नेश मेवानी यांनी गुजरात मध्ये दलित अत्याचारांविरोधात मोठा आवाज उठवलेला आहे. या दोन प्रभावशाली युवा नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागे पुण्यातील कॉँग्रेसचे निकटवर्ती आणि राजकीय विश्लेषक तहसीन पूनावाला यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान, तहसीन पूनावाला यांनी कन्हैयाकुमार, जिग्नेश मेवानी, शहेला रशीद या युवा नेत्यांचा एक मोठा कार्यक्रम घेतला होता. त्यांची हीच जुनी मैत्री पुढे कन्हैयाकुमार, जिग्नेश यांच्या काँग्रेस प्रवेशासाठी महत्वाचा दुवा ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर पंजाब मधील राजकीय नाट्यावेळीही प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू दिल्लीत आले तेव्हा पूनावाला यांच्या घरीच थांबले होते असेही समजते.
