पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
पुणे:काल मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राला मुसळधार पावसानं अक्षरश: झोडपून काढलेआहे. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले असून धरणं ओसंडून वाहत आहे. यानंतर आता सप्टेंबर महिन्याच्या शेवटी पुन्हा एकदा राज्यात पावसाचा जोर वाढत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.
मागील काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र कार्यरत आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वरूणराजा बरसला आहे. तर येत्या 24तासात बंगालच्या उपसागरातील हवेच्या कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भासहीत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर अधिक असणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
आज कोकण आणि पूर्व विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्या पुणे, नाशिक,कोकण आणि पूर्व विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे
