हिंमत असेल तर किरीट सोमय्यांनी मुंबै बॅंकेतील भ्रष्टाचार बाहेर काढावा – राजू शेट्टी
कोल्हापूर: “साखर कारखान्यांचा गैरव्यवहार खणून काढताना आम्ही प्रांत, पक्ष असा भेदभाव केला नाही. भाजपचे नेते किरीट सोमय्या मात्र विशिष्ट पक्षाच्या राजकीय नेत्यांच्या मागे लागले आहेत. विशिष्ट नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढत आहेत. शेतकऱ्यांचा वापर राजकारणासाठी करत आहेत. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेतील भ्रष्टाचार बाहेर काढावा,” असे आव्हान स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिले.
पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील पूरग्रस्त नागरिकांना आठ दिवसांत नुकसान भरपाई न मिळाल्यास या भागात मंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशाराही त्यांनी या वेळी दिला. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, ‘महापूर येऊन दोन महिने उलटले. अजूनही शेतकरी आणि पूरग्रस्त नागरिकांना सरकारची मदत मिळाली नाही. ही मदत लवकर मिळावी अशी अपेक्षा आहे. तसे न झाल्यास जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल. आता कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त नागरिकांची थांबण्याची मानसिकता राहिलेली नाही. त्यामुळे देणार की नाही आणि देणार असाल तर कधी देणार, किती देणार हे जाहीर करा. आठ दिवसांत मदत न मिळाल्यास मंत्र्यांना भागात फिरणे मुश्कील करू, त्यांच्या गाड्या अडवू.”
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी ठराविक लोकांच्या उपस्थितीत ऊस परिषद घेण्यात आली. यंदा मात्र दसऱ्यानंतर नेहमीप्रमाणे भव्य उस परिषद घेण्यात येईल. त्याला कोणीही अडवू शकणार नाहीत असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.
