Saturday, September 26, 2026
Latest NewsPUNE

पिंपरी चिंचवडमध्ये बांधकाम कामगारांच्या महा लसीकरण मोहिमेला सुरुवात

पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आरोग्य विभाग, क्रेडाई पुणे मेट्रो आणि फरांदे स्पेसेस यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड परिसरात बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी मोफत महा लसीकरण मोहिमेला नुकतीच सुरुवात झाली. पुनावळे येथील फरांदे स्पेसेस यांच्या बांधकाम प्रकल्पावर आयोजित कार्यक्रमात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते या मोहिमेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.

पिंपरी चिंचवड शहर अभियंते मकरंद निकम, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. पवन साळवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष आणि फरांदे स्पेसेसचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनिल फरांदे, व्यवस्थापकीय संचालक आकाश फरांदे, अभिनव फरांदे, क्रेडाई पुणे मेट्रोचे उपाध्यक्ष विनोद चंदवानी, सतीश अगरवाल, संतोष कर्णावट, सपना राठी,  मिलिंद तलाठी, कुणाल चुघ, लीना कुकरेजा, क्रेडाई पुणे मेट्रोचे महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर, महाव्यवस्थापिका उर्मिला जुल्का, समीर पारखी,  संतोष ताकभाते, अब्राहम बारीक आदी या वेळी उपस्थित होते.

.या वेळी बोलताना राजेश पाटील म्हणाले, “ या संकटाला सामोरे जाण्यासाठी लसीकरण हा एकमेव आणि प्रभावी पर्याय आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आरोग्य विभाग आणि क्रेडाई पुणे मेट्रोने एकत्रितपणे हाती घेतलेल्या आजच्या या लसीकरण मोहिमेचा फायदा बांधकाम मजूरांबरोबरच त्यांच्या कुटुंबियांना देखील होणार आहे. अशा पद्धतीच्या विशेष लसीकरण मोहिमा हाती घेण्यासाठी आजवर महापालिकेकडे लस उपलब्ध होत नव्हती मात्र आता लसींची उपलब्धता वाढल्याने या महा लसीकरण मोहिमेचे आयोजन आपण करू शकत आहोत याचा आनंद आहे.

”पुणे, पिंपरी चिंचवड आणि परिसरातील जास्तीत जास्त बांधकाम मजुरांचे लसीकरण करण्यासाठी क्रेडाई पुणे मेट्रो कटिबद्ध आहे. पुणे शहरातील क्रेडाई पुणे मेट्रो सभासदांच्या प्रकल्पावरील साधारण २० हजार हून अधिक बांधकाम कामगारांचे  मोफत लसीकरण करून घेण्यात आले आहे. आता येत्या ३० सप्टेंबर पर्यंत पिंपरी चिंचवड परिसरात ७ हजार मजुरांचे लसीकरण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. याबरोबरच कामगार कल्याण समितीच्या अंतर्गत बांधकाम मजूरांसाठी आरोग्य शिबिरे, बीओसीडब्लू नोंदणी यांसारखे कार्यक्रम देखील वेळोवेळी सुरू असतात, अशी माहिती अनिल फरांदे यांनी दिली.कामगारांबरोबर त्यांचे कुटुंबीय यांचाही समावेश या महा लसीकरण मोहिमेत करण्यात आला असून कोविडच्या सर्व नियमांचे पालन करीत या मोहिमेचे आयोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading