Sunday, August 2, 2026
ENTERTAINMENTLatest News

शेफालीने माझं आयुष्य बदलून टाकलं आहे – काजल काटे

सध्या झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका गाजतेय. त्यामधील श्रेयस आणि प्रार्थनाची जोडी आणि छोटी परी हिची चर्चा घराघरात होतेय. मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांची फौज आहे. मालिकेत अजून एक व्यक्तिरेखा लक्ष वेधून घेतेय ती म्हणजे शेफाली. नेहाची कलीग आणि जवळची मैत्रीण शेफाली हिची भूमिका अभिनेत्री काजल काटे अगदी चोख बजावतेय. तिच्या व्यक्तिरेखेबद्दल तिच्या सोबत साधलेला खास संवाद
१. शेफाली या भूमिकेसाठी जेव्हा तुझी निवड झाली तेव्हा तुझी प्रतिक्रिया कशी होती? तुझ्यामध्ये आणि शेफाली मध्ये किती साम्य किंवा फरक आहे?
 – मला या मालिकेसाठी फोन आला. जवळपास ७० मुलींमधून माझी शेफाली या भूमिकेसाठी निवड करण्यात आली होती. शेफाली ही माझ्यासारखीच आहे. आनंदी, सगळ्यांना हसवत असणारी काहीशी अल्लड अशी मी सुद्धा आहे. त्यामुळे शेफाली माझ्या फार जवळची आहे आणि ती साकारताना मला खूप मजा येते.
२. शेफाली या पात्रासाठी तुला कोणाकडून प्रेरणा मिळाली?
– शेफाली म्हंटल कि माझ्या डोळ्यासमोर आले ते कभी ख़ुशी कभी गम चित्रपटातील काजोल आणि जाब वी मेट मधली करीना. या दोघींचं मिश्रण म्हणजे शेफाली. शेफाली हे खूप एनर्जेटिक कॅरेक्टर आहे. त्यामुळे सेटवरही मला सतत एनर्जेटिक राहावं लागत. शेफाली साकारताना सगळ्यांनीच खूप मदत केली आहे.
३. तुला तुझ्या व्यक्तिरेखेसाठी प्रेक्षकांकडून काय प्रतिक्रिया मिळतेय?
– शेफाली माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली आहे. शेफालीने माझं आयुष्य बदलून टाकलं आहे. मला आज लोक ओळखायला लागली आहेत. आता मी सुद्धा काहीसा शेफालीप्रमाणे विचार करायला लागले आहे. त्यामुळे मीच स्वतः शेफालीच्या प्रेमात आहे. तिच्यावर प्रेक्षक ही खूप प्रेम करतात. मला मेसेजेस, फोनद्वारे लोकं आवर्जून प्रतिक्रिया कळवतात. शेफाली सारखी आमच्या आयुष्यात एक तरी मैत्रीण असावी अशी प्रतिक्रिया जेव्हा मला मिळाली तेव्हा मला खूप आनंद झाला.
४. मायरासोबत ऑफस्क्रीन काय धमाल चालू असते?
– परी जशी मालिकेत दिसते त्यापेक्षा जास्त मस्ती ती सेटवर करते. ती सेटवर आली कि सगळ्यात आधी मला आणि प्रार्थनेला भेटते आणि मग ती रेडी व्हायला जाते. सेटवर तिची मी बेस्ट फ्रेंड आहे.रिल्स बनवण्यात ती माहीर आहेच पण तिच्या कामात पण ती खूप परफेक्ट आहे. तिला केवळ तिचे नाही तर आमचे पण डायलॉग्स पाठ असतात. ती खूप गोड आहे आणि ती सेटवर असल्यामुळे एक वेगळीच मजा येते.
५. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे हे तुझे सहकलाकार आहेत हे तुला कळल्यावर तुझी काय प्रतिक्रिया होती?
– पहिल्या दिवशी सेटवर जाई पर्यंत मला काहीच कल्पना नव्हती कि माझे सहकलाकार कोण आहेत. सेटवर गेल्यावर समजलं कि मला श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे सोबत काम करायचं आहे. सुरुवातीला थोडी भीती वाटली होती पण श्रेयस आणि प्रार्थनाच्या वागण्यामुळे ही भीती कुठच्या कुठे पळाली. त्यांनी अनेक चित्रपटात काम केलं आहे हे त्यांच्या वागण्यातून त्यांनी कधी जाणवू दिलं नाही. सेटवर श्रेयस खूप धमाल मस्ती करत असतो. त्याचबरोबर प्रार्थनासोबत स्क्रीनवर दिसतं त्यापेक्षा खास बॉण्डिंग आमच्यात आहे. सेटवर आम्ही कायम एकत्र जेवायला बसतो. आमचं सगळ्यांचं बॉण्डिंग इतकं छान झालं आहे कि आमची दुसरी फॅमिलीच इथे तयार झाली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading