पुणे महानगर क्षेत्रात गृह खरेदीमध्ये ८% तर विक्री मूल्यात २७% इतकी वाढ
पुणे : पुणे महानगर क्षेत्रात जानेवारी-जुलै २०१९ मध्ये ४९,००० तर जानेवारी-जुलै २०२१मध्ये ५३,००० घरांची विक्री होत यामध्ये ८% इतकी वाढ झाली. तर जानेवारी-जुलै २०१९ मध्ये २१ हजार ५०० कोटी रुपये तर जानेवारी-जुलै २०२१ मध्ये २७ हजार ५०० कोटी रुपये किंमतीच्या घरांची विक्री झाली. यामध्ये विक्रीमूल्यात तब्बल २७% वाढ पहायला मिळाली. विक्री मूल्यात झालेली वाढ ही आकाराने मोठ्या असलेल्या घरांच्या खरेदीमुळे झाल्याचे देखील समोर आले आहे. याबरोबरच पुण्याचा वायव्य भाग म्हणजेच हिंजेवाडी, वाकड, महाळुंगे, ताथवडे, बाणेर,सूस, बालेवाडी सोबत पिंपरी चिंचवड भागाला गृहखरेदीदारांची पसंती असल्याचे आणि बांधकाम व्यवसाय क्षेत्र हळूहळू वाढीच्या मार्गावर असल्याचे देखील अहवालामधून समोर आले आहे.
क्रेडाई पुणे मेट्रोच्या ३८ व्या सर्वसाधारण सभेमध्ये सीआरई मॅट्रिक्स यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘पुणे हाऊसिंग रिपोर्ट’मध्ये ही माहिती समोर आली आहे. सदर अहवालाचे अनावरण नुकतेच करण्यात आले. या वेळी महाराष्ट्र मेट्रो रेल कोर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षीत, संचालक अतुल गाडगीळ, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष अनिल फरांदे, सचिव अरविंद जैन, उपाध्यक्ष रणजीत नाईकनवरे, मनीष जैन, अमर मांजरेकर, राजेश चौधरी, आदित्य जावडेकर, विनोद चंदवानी, सीआरई मॅट्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गुप्ता आदी उपस्थित होते.
पुणे महानगर क्षेत्रातील बांधकाम क्षेत्राचा विचार करता जानेवारी ते जुलै २०१९ व २०२१ दरम्यान विक्री झालेल्या घरांची संख्या, आकार आणि किंमती यांवर अहवालातील आराखडे बांधण्यात आले आहेत.
याविषयी अधिक माहिती देताना अनिल फरांदे म्हणाले, “सध्य स्थितीवर आधारित सर्वेक्षण हे आजच्या अस्थिर बांधकाम क्षेत्राचा सामना करण्यासाठी एक योग्य मार्ग आहे. सदर अहवालात आयजीआर महाराष्ट्राच्या वतीने देण्यात आलेल्या ख-या आकडेवारीचा समावेश करण्यात आला असल्याने यामधून आश्चर्य वाटावेत असे निष्कर्ष समोर आले आहेत. अहवालात नमूद २०१९ व २०२१ चे आराखडे हे आशावादी आहेत. वैज्ञानिक विश्लेषणाद्वारे तयार करण्यात आलेल्या या अहवालाचा उपयोग पुण्यातील बांधकाम व्यवसायिकांना भविष्यात यशस्वी प्रकल्प उभारणीसाठी निश्चित होईल.”
भारतातील बांधकाम व्यवसाय क्षेत्रासाठी एक विश्वसनीय स्त्रोत म्हणून सीआरई मॅट्रिक्स या संस्थेची ओळख आहे. या क्षेत्राशी संबंधित प्रारूपे आम्ही विकसित केली असून त्याद्वारे बांधकाम क्षेत्रातील सध्याची परिस्थिती, माहिती विश्लेषण करीत अंदाज बांधले जातात. इंडेक्सटॅप व फ्लोअरटॅप या दोन प्लॅटफॉर्मद्वारे बांधकाम क्षेत्राशी आवश्यक व प्रमाणित माहितीचा वापर सदर अहवालामध्ये करण्यात आला आहे. पुणे हाऊसिंग रिपोर्टमधून समोर आलेल्या माहितीचा फायदा पुणे महानगर क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांना होईल अशी आशा सीआरई मॅट्रिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक गुप्ता यांनी व्यक्त केली.
पुणे मेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ यांनी या वेळी पुणे मेट्रो संदर्भात इत्थंभूत माहिती क्रेडाईच्या सदस्यांना दिली.
