पुणे महापालिकेच्या 15 हजार कर्मचाऱ्यांना सातव वेतन लागू

पुणे : पुणे महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा नगरविकास विभागाने निर्णय घेतला आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत यासंदर्भातील जीआर काढणार असल्याचे आज झालेल्या बैठकीमध्ये जाहीर करण्यात आले आहे. दरम्यान, पालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सातव्या वेतन आयोगाचा  निर्णय आठवड्याभरात सोडवू असे उपमुख्यमंत्री अजित पवार  यांनी सांगितले होते.

अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, निलम गोऱ्हे, महापौर मुरलीधर मोहोळ, पृथ्वीराज सुतार, कामगार संघटना प्रतिनिधी उपस्थित होते. अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार  यांनी दिली. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले, महापालिकेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आजपासून सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील थकबाकी पाच टप्प्यात देण्यात येणार आहे. ग्रेड पे बाबत जीआर आल्यानंतर समजेल. यामध्ये कोणत्या सूचना मान्य झाल्या हे देखील समजणार आहे. 

सातव्या वेतन आयोग लागू केल्यानंतर थकीत 525 कोटी रुपये पाच टप्प्यात दिले जाणार आहेत. सध्या महापालिकेमध्ये अधिकारी आणि कर्मचारी असे एकूण 15 हजार 76 जण कार्यरत आहेत. जे कर्मचारी 1 जानेवारी 2016 नंतर निवृत्त झाले आहेत त्यांना देखील याचा लाभ मिळणार आहे.शासनाने 30 जानेवारी 2019 पासून सातवा वेतन आयोग लागू केला आहे. सध्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 1800 कोटी रुपये खर्च होत आहेत. सातवा वेतन आयोग लागू झाल्याने आता 2200 कोटी रुपये खर्च होणार आहे.महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी याच्या एकूण वेतनमध्ये 23 टक्क्यांची पगार वाढ झाल्याचे विक्रम कुमार यांनी सांगितले.

दरम्यान, पुणे मनपातील कर्मचार्‍यांना लवकरात लवकर सातवा वेतन आयोग लागू व्हावा यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप  यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नुकतेच निवेदन दिले होते.

Leave a Reply

%d bloggers like this: