आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी राज्यात उभी करणार तलवारबाजी अकादमी- सतेज पाटील यांची घोषणा

मुंबई : अत्याधुनिक क्रीडासाहित्य आणि राष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देत आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रात सर्वसमावेशक अशी तलवारबाजी अकादमी अर्थात फेन्सिंग अॅकॅडेमी विकसित करण्याची घोषणा राज्याचे गृहराज्यमंत्री, भारतीय तलवारबाजी संघटनेचे उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष  सतेज पाटील यांनी केली आहे. १२ सप्टेंबर रोजी साजऱ्या होत असलेल्या जागतिक तलवारबाजी दिनाच्या निमित्ताने बोलताना श्री पाटील यांनी तलवारबाजी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेणार असल्याचे व अखिल भारतीय स्तरावरील फेंसिंग लीग स्पर्धांचे आयोजन महाराष्ट्रात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे.

शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विडा उचलला आणि त्यात युद्धकलेला अनन्यसाधारण महत्त्व दिले. तलवारबाजी, दांडपट्टा यांसारखे युद्धकलेचे प्रकार या मातीत अगदी खोलवर रुजले. छत्रपतींच्या घराण्यातील छत्रपती शाहू महाराजांनीदेखील क्रीडाक्षेत्रात कुस्तीसारख्या खेळाला राजाश्रय दिला, खेळाडूंना सर्वतोपरी सुविधा निर्माण करून दिल्या आणि कुस्ती महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज हे माझे प्रेरणास्थान व ऊर्जास्त्रोत आहेत. तलवारबाजी हा महाराष्ट्राची लढाऊ वृत्ती अधोरेखित करणारा, भावनिक नाते सांगणारा खेळ संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे उद्गार  पाटील यांनी काढले आहेत.

धाडस, सावधानता आणि चपळता या तीन गुणांचा कस लागणाऱ्या या क्रीडाप्रकारामध्ये महाराष्ट्राने गुणकौशल्य प्राप्त करावे आणि ऑलिम्पिकसारख्या जागतिक व्यासपीठांवर महराष्ट्र व भारताचे नाव उज्ज्वल करावे यासाठी काही ठोस पावले उचलली जात आहेत. आज या प्राचीन युद्धकलेने आधुनीक रूप धारण केले आहे. जगभरात आधुनिक तलवारबाजी खेळाचा प्रसार व प्रचार यांचे कार्य जोमाने सुरू असून आधुनिक इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या या क्रीडाप्रकाराकडे युवापिढी आकर्षित होत आहे.

“महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील भव्य-दिव्य लीग स्पर्धांचे आयोजन करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. भारतीय तलवारबाजी महासंघाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत असताना जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय  तलवारबाजी स्पर्धा महाराष्ट्रात व्हाव्यात यासाठी मी पुढाकार घेणार आहे. महागडे तलवारबाजी साहित्य सर्वसामान्य खेळाडूंच्या आवाक्‍यात यावे, तसेच गुणवंत खेळाडूंना जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याची संधी मिळावी यासाठी लागणारा निधी उपलब्ध व्हावा म्हणून ‘सीएसआर’च्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे,” असेही पाटील यांनी म्हटले.

Leave a Reply

%d bloggers like this: