अभियांत्रिकी दृष्टीकोनातून प्रत्येकाने उपायकारक बनावे – डॉ. दीपक शिकारपूर

पुणे : “अभियंता हा समस्यांवर उत्तर शोधणारा असतो. तो क्रियाशील असतो. त्याच्यात नवनिर्माणाची क्षमता असते. अभियांत्रिकी हा एक दृष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनातून प्रत्येकाने समस्येवर उपाय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे गृहिणी आहे. तीदेखील एक अभियंताच असते. उपलब्ध संसाधनांचा वापर करून घराला आकार देते,” असे प्रतिपादन प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांनी केले.
भारतरत्न डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या सन्मानार्थ साजरा होणाऱ्या राष्ट्रीय अभियंता दिवसाचे औचित्य साधून सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने ‘सुर्यदत्ता विश्वेश्वरय्या इंजिनिअरिंग एक्सलन्स अवार्ड-२०२१’च्या वितरणप्रसंगी डॉ. शिकारपूर बोलत होते. बांधकाम व्यावसायिक सुहास लुंकड, सीओईपी माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष, उद्योजक भरत गिते, उद्योजक नितीन नाईक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, सुवर्णपदक, सन्मानचिन्ह आणि स्कार्फ असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
बावधन येथील सुर्यदत्ताच्या कॅम्पसमध्ये झालेल्या या कार्यक्रमावेळी विश्वेश्वरय्या सभागृहाचेही उद्घाटन झाले. प्रसंगी आयटी तज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, संस्थेच्या सल्लागार मंडळाचे सचिन ईटकर, ‘सूर्यदत्ता’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि समूह संचालक प्रा. डॉ. शैलेश कासंडे,  संचालक प्रा. सुनील धाडीवाल, मुख्य विकास अधिकारी सिद्धांत चोरडिया आदी उपस्थित होते. १५० पेक्षा अधिक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. अभियांत्रिकीबद्दल तीनही पुरस्कारार्थीना प्रश्न विचारात संयोजकांनी त्यांना बोलते केले.
डॉ. दीपक शिकारपूर म्हणाले, ” आजच्या काळात अभियंत्यांना स्मार्टनेस आवश्यक आहे. कारण एकविसाव्या शतकात सगळ्यांना तात्काळ उपाय हवेत. त्यासाठी आपण बहुकौशल्यासोबतच आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सकारात्मकता, क्रियाशीलता आणि महत्वाकांक्षा या गोष्टी आत्मसात करायला हव्यात.” मुलांना प्रत्यक्ष शिक्षणाची सवय व्हावी, याकरिता शिक्षकांनीही प्रत्यक्ष शिकवण्याची तयारी करायला हवी, असेही डॉ. शिकारपूर यांनी नमूद केले.
प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “थोर अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा जन्मदिवस भारतासह श्रीलंका आणि अन्य देशांत साजरा होतो. स्थापत्य अभियंता आणि म्हैसूरचे १९ वे दिवाण असलेल्या विश्वेश्वरय्या यांना स्टेट्समन म्हणूनही ओळखले जाते. देशाचा सर्वोच्च असा भारतरत्न पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. जनतेच्या जगण्यावर परिणाम करणारे कार्य त्यांच्या हातून घडले होते. राष्ट्राच्या जडणघडणीत अभियंत्यांचे योगदान मोलाचे आहे.”

Leave a Reply

%d bloggers like this: