लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार

मुंबई : लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील कार्यालयात १६ सप्टेंबरला त्यांच्या पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत त्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

सुरेखा पुणेकर राजकारणात प्रवेश करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. मात्र त्या कोणत्या पक्षात जाणार हे स्पष्ट झाले नव्हते. परंतु आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या जुलैमध्ये त्यांनी विधानसभेची निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून त्या राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. नांदेडमधील देगलूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले. त्यामुळे ही जागा रिक्त आहे. तेथून अनेकांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. देगलूर मतदार संघातील पोट निवडणुकीच्या तोंडावर सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांना या जागेवर संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: