पुण्यातील ५१ गणेश मंडळांचा विघ्नहर्ता रक्तदान महायज्ञ

पुणे : आरोग्योत्सवाच्या माध्यमातून यंदाचा गणेशोत्सव साज-या करणा-या जय गणेश व्यासपीठांतर्गत असलेल्या ५१ गणेशोत्सव मंडळांनी विघ्नहर्ता रक्तदान महायज्ञ केला. शहरात विविध १३ ठिकाणी रक्तदान शिबीरांचे आयोजन या मंडळांनी एकाच वेळी करुन तब्बल ९१० बाटल्या रक्त संकलित केले. लसीकरण मोहिमांसोबतच रक्तदान शिबीरे राबवून मंडळांनी हाती घेतलेली आरोग्यचळवळ शहराच्या कानाकोप-यात पोहोचविण्याचा संकल्प या मंडळांनी केला आहे.

अप्पा बळवंत चौकातील नू.म.वि. माध्यमिक शाळेच्या प्रांगणात जय गणेश व्यासपीठांतर्गत असलेल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत दिवे लावून यापुढे कोणालाही रक्त कमी पडू नये याकरीता व समाजोपयोगी उपक्रम राबविणार असल्याचा निर्धार केला. जय गणेश व्यासपीठाचे महेश सूर्यवंशी, सुनील रासने, शिरीष मोहिते, पीयुष शाह यांची ही संकल्पना असून त्यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. साईनाथ मंडळ ट्रस्ट, सेवा मित्र मंडळ ट्रस्ट, हिंदमाता तरुण मंडळ, विधायक मंडळ, काळभैरवनाथ तरुण मंडळ, जय जवान मंडळ, अष्टविनायक मित्र मंडळ, शिवराज मित्र मंडळ, राष्ट्रीय साततोटी मंडळ यांनी संयोजनात महत्वाची भूमिका बजावली.

येरवडा परिसरातील प्रतीकनगर येथील श्री सिद्धिविनायक मंदिर, कसबा पेठेतील कुंभारवाडा येथील वंदे मातरम मंडळ, नाना पेठेतील साखळीपीर तालीम, आनंदनगर येथील रॉयल पुणेकर मित्रमंडळ, गुरुवार पेठेतील वीर शिवराज मंडळ, खडकी येरवडा येथील नवज्योत मित्रमंडळ, दत्तनगर शिवांजली मित्रमंडळ, लक्ष्मीनगर कोंढवा येथील श्री गणेश मित्र मंडळ, कसबा पेठेतील त्रिमूर्ती मित्रमंडळ, शुक्रवार पेठेतील अकरा मारुती कोपरा, कर्वेनगरमधील जयदीप मंडळ, जनता वसाहतीमधील वाघजाई मित्र फाउंडेशन, एरंडवणे येथील श्री शनी मारुती बालगणेश मंडळ, धनकवडीतील पंचरत्नेश्वर मित्रमंडळ, दारुवाला पूल मित्र मंडळ याठिकाणी रक्तदान शिबीरांचे आयोजन करण्यात आले होते.

पुण्यातील गणपती मंडळे सातत्याने सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. जय गणेश व्यासपीठाच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम यंदा राबविण्यात येत आहेत. मंडळ व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपापल्या भागात असे उपक्रम राबवून ख-या अर्थाने वेगळा गणेशोत्सव साजरा करण्याकरीता पुढाकार घेतला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: