मध्य पुण्यातील २८ गणेश मंडळे राबविणार निर्माल्य संकलन मोहिम

पुणे :  श्रीं चा गणेशोत्सव घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांद्वारे साजरा केला जातो. श्रीं ची पूजा करताना पत्री व विविध फुले अर्पण केली जातात. शास्त्रानुसार पूजेतील याच निर्माल्याचे विसर्जन योग्य पद्धतीने होणे गरजेचे आहे. मात्र, सध्या पर्यावरणरक्षण करत हे विसर्जन होताना दिसत नसल्याने मध्य पुण्यातील २८ गणेश मंडळांतर्फे निर्माल्य संकलन मोहिम राबविण्यात येणार आहे.
आधार सोशल फाऊंडेशन व गणेशोत्सव मंडळांच्या वतीने आयोजित निर्माल्य संकलन मोहिम-पर्यावरणपूरक उपक्रमाचे उद््घाटन सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद कार्यालयात झाले. यावेळी आमदार मुक्ता टिळक, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, स्वरदा बापट, श्रीनाथ भिमाले, आयोजक फाऊंडेशनचे अध्यक्ष दिलीप काळोखे, सविता काळोखे, अनिल काळोखे, प्रसाद जोशी, राहुल हांडे, सचिन शुक्ला, धनंजय भिलारे, पूरण हुडके, राजू आखाडे, राजेश शिंदे, कृष्णा जाधव, अमित धुमाळ आदी उपस्थित होते. श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल अण्णा थोरात यांचा विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य चळवळीला चालना देण्याकरीता सुरु झालेला सार्वजनिक गणेशोत्सव आजही तितक्याच मोठया स्वरुपात अविरतपणे सुरु आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाचे जगभरात आकर्षण असून याला मोठा इतिहास आहे. उत्सवात निर्माल्य संकलनाकरीता प्रशासकीय व्यवस्था नियोजन करते. मात्र, सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक संस्था व गणेशोत्सव मंडळांनी यामध्ये सहभागी होणे, ही बाब कौतुकास्पद आहे. उत्सवात आम्ही प्रदूषण करणार नाही आणि होऊ देणार नाही, ही संकल्पना चांगली आहे.

दिलीप काळोखे म्हणाले, गणेश मंडळांच्या माध्यमातून जमा झालेल्या निर्माल्याचे खत व उदबत्ती बनविण्यात येणार आहे. यामुळे निर्माल्याचे पावित्र्य देखील जपले जाणार असून पर्यावरणाचे रक्षण देखील होणार आहे. गणेशोत्सव मंडळांनी या मोहिमेत सहभाग घेतल्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश घराघरात पोहोचणार आहे, असेही त्यांनी सांगितले. आमदार मुक्ता टिळक, स्वरदा बापट यांनीही मनोगत व्यक्त केले. विनायक घाटे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: